
पूरपरिस्थितीत धाडसी व प्रामाणिक रणजित राजेशिर्के यांचे काम अभिमानास्पद – पालकमंत्री ॲड.अनिल परब
पूराच्या वेळी एस.टी महामंडळाची रोख रक्कम तब्बल नऊ तास एसटीच्या टपावर बसून सुखरुप सांभाळण्याचे धाडसाचे व प्रामाणिकपणाचे काम चिपळूण बसस्थानकाचे आगार व्यवस्थापक श्री.रणजित राजेशिर्के यांनी केले आहे. श्री.राजेशिर्के यांचा मला राज्याचे परिवहन मंत्री व या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अभिमान असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ॲड.अनिल परब यांनी आज चिपळूण येथे केले.
चिपळूण बसस्थानकाचे आगार व्यवस्थापक श्री.रणजित राजेशिर्के यांचा पालकमंत्री ॲड.अनिल परब यांच्या हस्ते आज चिपळूण येथे गौरव करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम, योगेश कदम, जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
संकटाच्या वेळी प्रत्येक माणूस प्रथम आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न करतो, परंतू यावेळी आपल्या कर्तव्याला प्राधान्य देवून काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे पालकमंत्र्यांनी यावेळी आभार मानले. हे कर्मचारी एस.टी. महामंडळाचे वैभव आहेत. सार्वजनिक मालमत्ता वाचविण्याचे काम एसटीच्या कर्मचाऱ्यांनी केले. या कामगिरीमुळे एसटी महामंडळाचा नावलौकिक आज देशभरात पोहोचला आहे. त्यामुळे या विभागाचा मंत्री म्हणून मला सार्थ अभिमान वाटत असल्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भविष्यात पुन्हा एसटी महामंडळाचा उत्कर्ष होईल, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
www.konkantoday.com