कोकण रेल्वेच्या चाळीस कर्मचार्यांनी एकमेकांचे हात धरत साहस करीत पुराच्या कंबरभर पाण्यातून पाचशे लोकांना जेवण पुरविले
आपल्या गाडीत असलेले प्रवासी उपाशी राहू नयेत म्हणून कोकण रेल्वेचा कर्मचारी व कंत्राटी कर्मचार् यानी चिपळूण येथील पुराच्या वेळी मोठे साहस दाखविले
जलप्रलयातील त्या ७२ तासांत कोकण रेल्वेच्या अधिकारी, कर्मचार्यांसह कंत्राटी कामगारांनी पुरात अडकूनही प्रवाशांसाठी जीवाची बाजी लावली. पुरामुळे चिपळूण स्थानकात अडकलेल्या शेकडो प्रवाशांची नाश्ता, जेवणाची व्यवस्था करण्यापासून अगदी रूळ ठाकठिक करण्यापर्यंतची कामे अविरतपणे सुरू ठेवली. काळोख, पूर याची तमा न बाळगता प्रसंगी कंबरभर पाण्यातून मार्गक्रमण करत दमल्या भागलेल्या कर्मचार्यांनी सादर सेवा हे कोकण रेल्वेचे ब्रीद सत्यात उतरवले.
सर्वाधिक जिगरबाज काम केलं ते रात्री चिपळूण स्थानकातील कोकण रेल्वेच्या कर्मचार्यांनी सकाळपासून दिलेल्या नाश्ता, जेवण नाश्त्याने स्थानकातील जेवणाचे सगळे जिन्नस संपले होते. स्थानकात उभ्या असलेल्या तुतारी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना रात्रीचे जेवण द्यायचे कसे, हा मोठा प्रश्नच होता. चिपळूणच्या स्थानकाला पुराच्या पाण्याचा वेढा होता. बाहेरून साहित्य स्टेशनला येण्याचा मार्गच बंद झाला होता. या स्थितीत खेड स्थानकात जेवण करण्याचा निर्णय झाला. साडेपाचशे लोकांचे हे जेवण टॉवर, व्हॅनच्या माध्यमातून अंजनी स्थानकापर्यंत आणण्यात आले. इथे एक नवं संकट उभे होते. इथून पुढे चिपळूणच्या मार्गावर पुराचे पाणी चढले होते. जेवण चिपळूणकडे जाणं कठीण होते. कोकण रेल्वेच्या चाळीस कर्मचार्यांनी एकमेकांचे हात धरत पुराच्या कंबरभर पाण्यातून पाचशे लोकांचे जेवण अंजनीवरून चिपळूण मार्गावर उभ्या असलेल्या आरएमव्हीपर्यंत नेले. मुसळधार पाऊस आणि मिट्ट काळोखात पायाखालच्या ट्रॅकखाली जमीन आहे की नाही याची कल्पना नसतानाही केलेले हे धाडस जीवावर बेतणारं होतं. या जिगरबाजांनी तुतारीतील या शेकडो लोकांच्या जेवणासाठी हे धाडस केलं. www.konkantoday.com