करोना रुग्ण दर एकपेक्षा कमी असलेल्या १४ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथील करण्याचा प्रस्ताव
करोना रुग्ण दर एकपेक्षा कमी असलेल्या १४ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथील करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला आहे. दोन दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ज्या जिल्ह्यांमध्ये करोना सक्रिय रुग्णदर एक किंवा त्यापेक्षा कमी असेल तेथील करोना विषयक निर्बंध कमी करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर केला जाईल असे सांगितले होते. त्यानुसार आरोग्य विभागाने निर्बंध शिथिलीकरणाचा प्रस्ताव सादर केला आहे.
राज्यातील ३५ जिल्ह्यांपैकी ज्या १४ जिल्ह्यांमध्ये तीन आठवड्यांपेक्षा जास्त सक्रिय रुग्णदर एक वा त्यापेक्षा कमी आहे अशा जिल्ह्यांची यादी तयार करण्यात आली आहे.
जुलै १८ ते २४ या कालावधीत सांगली मधील सक्रिय करोना रुग्ण दर ९.१ एवढा आहे. त्यापाठोपाठ सातारा ८.२, सिंधुदुर्ग ८, पुणे ७.४ , कोल्हापूर ६.३, अहमदनगर ६.२,बीड ५.८ तर सोलापूर व रत्नागिरी अनुक्रमे रुग्णवाढ दर हा ५ टक्के व ४.७ टक्के एवढा आहे. मुंबईत हाच दर २.३ टक्के असल्यामुळे लोकल ट्रेन सुरु करण्यासह अन्य निर्बंध शिथील करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सावध असल्याचे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. राज्याचा करोना रुग्णवाढ दर हा ४.५ टक्के आहे
www.konkantoday.com