महाराष्ट्रातील केवळ दोनच वैद्यकीय महाविद्यालयांना केंद्रांच्या निधीतून मंजुरी
जिल्हास्तरावरील रुग्णालयांना सक्षम करणे आणि डॉक्टरांची संख्या वाढविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्य़ात वैद्यकीय महाविद्यालय उभारणे या उद्देशाने तीन टप्प्यात राबविण्यात आलेल्या केंद्र सरकारच्या योजनेतून महाराष्ट्राच्या वाटय़ाला १५७ पैकी अवघी दोनच रुग्णालये-महाविद्यालये आली आहेत. करोनाच्या दोन्ही लाटांमध्ये देशात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या महाराष्ट्रात जिल्हास्तरीय रुग्णालय-महाविद्यालयाची गरज अधोरेखित झाल्याने ही योजना पुनरुज्जीवित करण्याची मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या पाच राज्यांना मिळूनच ८७ महाविद्यालय-रुग्णालये केंद्राने मंजूर केली आहेत.या योजनेतून महाराष्ट्राला केवळ गोंदिया आणि नंदुरबार या दोनच ठिकाणी महाविद्यालय-रुग्णालय सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. या योजनेअंतर्गत रुग्णालयाला येणाऱ्या खर्चापैकी ६० टक्के भार केंद्राकडून तर ४० टक्के राज्याकडून उचलला जातो.नंदूरबार, गोंदिया, चंद्रपूर, सातारा, परभणी, बुलढाणा, सिंधुदुर्ग, नाशिक, अमरावती, उस्मानाबाद, पालघर, अलिबाग या ठिकाणी रुग्णालय-महाविद्यालये सुरू करण्याची योजना होती.
परंतु, यापैकी केवळ दोनच महाविद्यालयांना केंद्रांच्या निधीतून मंजुरी मिळाल्याने अन्य ठिकाणी महाविद्यालये सुरू करण्याकरिता राज्याला आपल्या निधी वापरावा लागणार आहे
www.konkantoday.cim