
सिंधुदुर्गात सहा पट्टेरी वाघांचा वावर असल्याची उपवनसंरक्षकांची कबुली
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहा पट्टेरी वाघांचा वावर आहे. आंबोली ते तिलारी या भागात हा वावर आहे, अशी कबुली उपवनसंरक्षक नंदकिशोर रेड्डी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पट्टेरी वाघांच्या अस्तित्वाबाबत वन अधिकार्यांनी प्रथमच कबुली दिल्याने गेली अनेक वर्षे वाघांच्या अस्तित्वाबाबत असलेला संभ्रम दूर झाला आहे.सिंधुदुर्गात सह्याद्री पट्टा जैवविविधेने समृद्ध आहे. विशेष करून सावंतवाडीतील आंबोली ते दोडामार्ग मांगेलीपर्यंतच्या पट्ट्यात जैवविविधता मोठ्या प्रमाणावर आहे. यामध्ये पट्टेरी वाघ, बिबटे, हत्ती, गवारेडे, सांबर, शेकरू, साळिंदर, भेकरे आदी वन्यप्राणी तसेच विविध नैसर्गिक वनस्पती व पक्षी आहेत. वनखात्यामार्फत वन्यपण्यिांची गणती होते. परंतु या गणतीत वाघाचे अस्तित्व कुठेच आढळत नाही. सावंतवाडी आंबोली ते मांगेलीपर्यंतचा पट्टा टायगर कॉरिडॉर अर्थात इको सेन्सिटीव्ह झोन जाहीर करावा, यासाठी वनशक्ती व आवाज फाऊंडेशनने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामध्ये या भागात वाघाचे अस्तित्व नाकारण्यात आले होते. वन्यजीव संस्थान डेहराडून यांच्यावतीने वाघाचे सर्वेक्षण करण्यात आले. शिरीष पंजाबी आणि त्यांच्या सहकार्यांनी हे सर्वेक्षण केले होते. त्यात वाघाचे अस्तित्व आढळले होते. परंतु वनखाते हे अस्तित्व कागदावर कधीच दाखवत नव्हते. मायनिंग लॉबीला संरक्षण देण्यासाठी वाघाचे अस्तित्व वनखाते नाकारत असल्याचा आरोप पर्यावरणवादी स्टॅलीन दयानंद, डॉ. जयंत परूळेकर तसेच संदीप सावंत यांच्यासारखी मंडळी करत होती. परंतु आता उपवनसंरक्षक नंदकिशोर रेड्डी यांनी सहा वाघांचा वावर असल्याचे मान्य केल्यामुळे मायनिंग लॉबीसमोर मोठी अडचण येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. www.konkantoday.com