
मुंबई गोवा महामार्गावर मोकाट गुरांमुळे वाहनचालकांना डोकेदुखी
खेड : पावसामुळे पडलेल्या खड्ड्यामुळे मुंबई गोवा महामार्ग धोकादायक झालेला असतानाच महामार्गावरील आवाशी ते लोटे या दरम्यान रस्त्यावर फतकल मारून बसणाऱ्या मोकाट जनावरांमुळे महामार्गावरून वाहने हाकणे चालकांसाठी डोकेदुखी ठरू लागले आहे. रात्रंदिवस महामार्गावर फतकल मारून बसणाऱ्या किंवा कळपाने महामार्ग ओलांडणाऱ्या या पाळीव जनावरांचा वाली कोण हा प्रश्न उपस्थित होत आहे.
चौपदरीकरणाचे काम सुरु झाल्यापासून मुंबई गोवा महामार्गावर वाहने चालविणे अतिशय धोकादायक झाले आहे. रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे, कोसळणाऱ्या दरडी यामुळे महामार्गावर कधी अपघातांना सामोरे जावे लागेल याचा नेम राहिलेला नाही. त्यामुळे महामार्गावर वाहने हाकताना वाहन चालकांना अतिशय दक्ष रहावे लागत आहे. त्यातच आता आवाशी ते लोटे या दरम्यानच्या रस्त्यावर मोकाट जनावरांचा उच्छाद पाहावयास मिळत असल्याने वाहन चालकांना या भागात वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
महामार्ग चौपदरीकरणाचे रखडलेले काम आणि पाऊस यामुळे महामार्गावरील वाहतुकीचा वेग आधीच मंदावला आहे. त्यामुळे ज्या भागात चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे त्या भागात वाहन चालक वाहनाला गती देण्याच्या प्रयत्न करतात मात्र लोटे परिसरात रस्त्यावर फतकल मारून बसलेली जनावरे रहदारीला अडथळा ठरू लागली असल्याने चालकांना गती राखून वाहने हाकणे शक्य होत नाही.
रात्रीच्या वेळेत किंवा धुवांधार पावसात तर हा धोका आणकीणच वाढतो. रात्री किंवा पावसात रस्त्यावर फतकल मारून बसलेली जनावरे दिसत नसल्याने बसलेल्या जनावरांवर आदळून अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
महामार्गावर फतकल मारून बसणाऱ्या या पाळीव जनावरांचा योग्य तो बंदोबस्त केला नाही तर महामार्गावर भीषण अपघात होण्याची शक्यता आहे