
राजापुरातील वाटुळ येथे मंजूर सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल प्रशासकीय मंजुरीअभावी रखडले, निधी वितरित करा, आ. सदाभाऊ खोत यांची मागणी.
राजापूर तालुक्यातील वाटुळ येथे मंजूर करण्यात आलेले सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अद्याप प्रशासकीय मंजुरीअभावी रखडले आहे. या हॉस्पिटलसाठी आवश्यक निधीची तरतूद असूनही प्रत्यक्ष कामास सुरुवात होऊ शकलेली नाही. यामुळे स्थानिक जनतेमध्ये असंतोष असून या हॉस्पिटल करिता तत्काळ प्रशासकीय मान्यता देऊन निधी वितरित करावा व हॉस्पिटलच्या बांधकामास गती द्यावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी शासनाकडे केली आहे.हे सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या महत्त्वाच्या स्थानिक रस्त्यावर प्रस्तावित आहे. या महामार्गावर दरवर्षी मोठ्या प्रमाणात अपघात घडत असतात. विशेषतः रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतील रुग्णांसाठी त्वरित वैद्यकीय सेवा मिळवणे कठीण जाते. याठिकाणी अद्यापही योग्य सोयी-सुविधा असलेले हॉस्पिटल नाही. त्यामुळे रुग्णांना कोल्हापूर, किंवा मुंबईकडे वळावे लागते. सदर हॉस्पिटल मंजूर झाल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला होता. परंतु, प्रशासकीय मंजुरी व निधी वितरण न झाल्यामुळे या कामास अजूनही प्रारंभ झालेला नाही.पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून आमदार सदाभाऊ खोत यांनी शासनाला या हॉस्पिटल करिता तत्काळ प्रशासकीय मान्यता देऊन निधी वितरित करण्याची मागणी केली आहे. सदर मागणीस अनुकूल प्रतिसाद दिल्यास संपूर्ण राजापूर परिसरासह रत्नागिरी जिल्ह्याला दर्जेदार आरोग्य सुविधा प्राप्त होणार असून, अपघातग्रस्तांसाठीही जलद उपचाराची सोय होणार आहे. सदर मागणी पावसाळी अधिवेशनात लावून धरावी, या संदर्भात पंचक्रोशी ग्रामविकास समिती, राजापूर (मुंबई) यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.www.konkantoday.com




