निरलस प्रेम करणारा मित्र हरवला.
कोकणात कर्तृत्ववान लोक जन्मास आले .रत्नागिरी हे नाव त्यामुळे सार्थ ठरले आहे .त्याचबरोबर इथे पुढे जाणा–याचे पाय ओढले जातात म्हणून कोकणी माणसाकडे तशा नाराजीच्या नजरेने बघीतले जाते. पण हे दुषण खोटे ठरवून आपल्या माणसाला मोठे करण्यासाठी जीवाचे रान करणारेही अनेक आहेत त्यामध्ये शिपोशी गावचे सुपुत्र आमचे जीवलग मित्र रवींद्र साळुंखे यांचे आवर्जून घ्यावे लागेल.
१५ जुलैच्या सकाळी रवींद्र साळुंखे यांनी पुण्यातल्या खासगी इस्पितळात अखेरचा श्वास घेतला.आमचे वर्गमित्र विश्वनाथ माने यांच्याकडून कळले पण आजारातून बरा झालेल्या रवीने कधी जाणवू दिले नव्हते त्यामुळे त्या बातमीवर कुणाचाच विश्वास बसत नव्हता.
शिपोशी गावचे सरपंच श्री.हरेश जाधव यांना मी फोन केला.त्यांनी तीन चार दिवसात झालेल्या घडामोडी सांगितल्या .रवी आपल्याला कायमचा साेडून गेल्याचं वृत्त खरं असल्याचं कळलं.वादळात एखादा वृक्ष उन्मळून पडावा आणि असंख्य पक्षी निराधार व्हावे तशी गत आम्हा अनेक मित्रांची झाली.आमच्याच वयाचा पण त्याच्या मिलनसार स्वभावामुळे अधिक पोक्त वाटणारा ,त्याच्या सान्निध्याची ओढ लावणारा हा मित्र कोरोनाच्या वादळाचा बळी ठरला.
दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही पुढच्या शिक्षणाचा विचार न करता मी शेतात नांगर धरलेला असताना मला चौथीपर्यंत शिकवणारे ,पाच वर्षांपुर्वी बदली होऊन दुस-या गावात गेलेले श्री.फापे गुरूजी माझी चौकशी करायला आले आणि दुस-या दिवशी पंचवीस किलोमीटरचा प्रवास अर्धा डोंगरवाटांचा आणि अर्धा लाल सडकेवरचा पायी प्रवास करून शिपोशी गावात घेऊन आले.तिथल्या न्या.व्ही.व्ही.आठल्ये कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेऊन दिला तसेच तिथल्या वसतीगृहात व्यवस्था करून ते संध्याकाळी डाेंगरातील पायवाटेने बाजूच्या त्यांच्या आडवली गावात निघून गेले.
माझं रिंगणं गाव आणि शिपोशी यात फार काही फरक नव्हता पण आमच्या रिंगणे हायस्कूल दगडी मातीच्या भिंती असलेल्या इमारतीत भरत होतं तर इथे जांभ्या दगडाच्या सुटसुटीत इमारती होत्या.शाळेच्या बाजूलाच छोटी बाजारपेठ वाटावी अशी दुकानं होती.किराणा मालाचं दुकान,चहा व वडा मिसळ जेवण मिळणारं हाॅटेल,इथल्या सोसायटीच्या दुकानात कापडही मिळत होतं.
इथे प्रथम वर्ष पूर्ण केलं त्या एवढ्याशा काळातही अनेक मित्र मिळाले त्यात आमचा रवी साळुंखे होता.तसे आम्ही सगळे गरीब घरचेच असल्याने आणि कुणी कुणावर बडेजाव करावं असं काही नसल्यानं आमच्या तारा लवकरच जुळल्या.इथल्या वाचनालयानं माझी वाचनाची भूक वाढवली तसंच इथल्या गॅदरिंगमध्ये ‘शंभूराजे’ ही एकांकिका बसवण्याची जबाबदारी मला पार पाडता आली त्यातून मला वेगळा आत्मविश्वास मिळालाच पण त्या एकांकिकेत सादर केलेल्या औरंगजेबाच्या भूमिकेमुळे मला वेगळी ओळख मिळाली.शिपोशी सोडल्यास एकेचाळीस वर्ष झाली.पण माझे मित्र त्या भुमिकेची आठवण करून माझी ओळख करून देतात.
मी मुंबईला आल्यानंतर ब-याच वर्षांनी प्रभानवल्ली गावचा विठोबा चव्हाण आणि मि दादरच्या रेल्वेपुलावर समोरासमोर आलो. काही हरवलेलं पुन्हा मिळावं तसा आनंद आम्हाला झाला.आम्ही गळाभेट घेतली.आणि बोलत बोलत दादरच्या करोना स्टोअर्समध्ये आलो.विठोबा ते दुकान चालवीत असे.मग आमच्या भेटी वाढत गेल्या.रवी नातेसंबंधाने विठोबाच्या संपर्कात असल्यामुळे त्याने माझा फोन विठोबाकडून मिळवला.
तंत्रज्ञान क्रांतीने जग जवळ आले.अॅण्ड्राईड मोबाईलने तर संप्रेषण सुलभीकरणाची मोठी सुविधा निर्माण केली.परिणाम अनेकांना जुने एक एक मित्र मिळत गेले.
पंधरा वर्षापूर्वी मला असाच एक फोन आला.”आपण सुभाष लाड का ?”
मी “होय ” म्हटलं .मग समोरून “अरे मी रवी साळुंखे बोलतोय ,ओळखलास का ? शिपोशी काॅलेजला आपण एकत्र होतो,तुझा ‘शंभूराजे’ मधला औरंगजेब आजही आठवतो रे आम्हाला.”
काॅलेजचा मित्र एवढ्या दिवसानंतर भेटल्याचा खूपच आनंद झाला.भरपूर गप्पा आणि आठवणी जागवल्या.पुन्हा त्या वयात गेल्यासारखे वाटले.आमच्या विठोबा चव्हाण मुळे आमची पुन्हा भेट झाली.रवीने आपण कामगार रंगभूमीवरच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धांमध्ये भाग घेतला असून विक्रोळीतील कामगार भवनमध्ये प्रयोग आहे.तुला जवळ असेल तर ये बघायला असंही त्याने सांगितले.मित्राला भेटण्याची ओढ असल्याने मी आवर्जून प्रयोगाला हजर झालो.नाटक सुरू होण्यापूर्वीच मी रंगमंचामागे जाऊन चौकशी केली तेव्हा या गड्याने नाटकातल्या वेषभूषेतच कडकडून गळा भेट घेतली आणि लवकर जाऊ नकोस आपण शांतपणे बोलू या असं सांगून आपल्या तयारीला गेला.
पुढे अनेक वर्षे मी रवीच्या मुंबईतल्या नाट्य प्रयोगांना हजेरी लावत असे व त्याच्या विविध भूमिकांतील सहज सुंदर अभिनयाचा आनंद लुटत असे.रत्नागिरीतील नाट्य कलाकारांना त्यांने एकत्र आणून संकल्प कलामंच ची निर्मिती करून रंगमंचावर विविध प्रयाेग करण्याचा, त्यांच्या संकल्पनांना प्रत्यक्षात उतरवण्याचा आनंद लुटत होता. नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने तो महाराष्ट्रातल्या अनेक रंगमंचावर त्याला अभिनय करण्याची संधी मिळाली.राज्य नाट्य स्पर्धेत रवीने अभिनयाची पारितोषिके मिळवली त्याचबरोबर अनेक मित्र ही मिळवले.ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांच्याशी जिव्हाळ्याचे नाते होते.दोन वर्षापूर्वी रवीने मला रत्नागिरीतल्या सावरकर नाट्यगृहातील प्रयोग बघण्यासाठी बोलावले होते.मला पूर्ण वेळ देता येणार नव्हते म्हणून मी भेटून जाईन असे सांगितले.मी कलाकारांच्या खोलीत गेलो तेव्हा माझा हात धरून गवाणकर साहेबांकडे नेऊन आम्ही काॅलेजचे मित्र आहोत असे सांगितले व मला त्यांच्या बाजुला बसवून निघून गेला.गप्पांच्या ओघात साहेबांनी केलेले रवीचे कौतुक ऐकून रवीचे नाट्य क्षेत्रात माेठे काम व नाव असूनही तो स्वत:ला छोटा कलाकार मानत असे या त्याच्या विनम्रतेने त्याला उंचीवर नेऊन ठेवले होते.
राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या ‘ नाटककार ला.कृ.आयरे पुरस्काराने ‘रवीला लांजा येथील साहित्य संमेलनात सन्मानीत केले गेले .आपल्याच मातीतल्या संस्थेने केलेल्या गौरवाने तो भारावून गेला होता.
रवी कधीही राजकारणात उतरला नाही तो त्याचा पिंडच नव्हता.पण त्यांच्यातील सामाजिक कार्यकर्ता मात्र क्रियाशील होता. आपल्या नोकरीचा वेळ,नाट्यकलेवरच प्रेम यामुळे गावच्या विकासातच त्याने स्वत:ला गुंतवले होते.शिपोशी गावच्या न्या.व्ही.व्ही.आठल्ये विद्यामंदिराच्या माजी विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यातून ग्रामसुधारणा आणि शालेय विकासात हातभार लावण्याची त्याची संकल्पना सर्व माजी विद्यार्थ्यांनी उचलून धरली.शिपोशी गावात झालेल्या पोलीस भरती प्रशिक्षण शिबीराने रत्नागिरीकरांना आदर्शपाठ ठरला आहे.
ब–याच वर्षांनी परत भेट झालेल्या या मित्रांने माझ्यावर असीम प्रेम केले.माझ्या कविता ,माझे सामाजिक कार्य याबद्दल तो भरभरून बोलायचा.नुसतं बोलायचं नाहीतर माझ्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्याची केवढी धावपळ होती.माझ्या नावाच्या आद्याक्षरांनी केलेली कविता, मुंबईतल्या त्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रत्नागिरीहून त्याचे येणे.परतीच्या प्रवासात कार्यक्रमाचे इतिवृत्त कौतुकाने लिहिणे.हे सारं काही मला हवेत नेणारं होतं.
मला ‘ समाजसेवक नानासाहेब शेट्ये सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार ‘जाहिर झाल्याचा माझ्यापेक्षा रवीलाच जास्त आनंद झाला होता. साखरपा येथे झालेल्या समारंभात आपल्या मित्र मंडळींना घेऊन हजर होता.पुन्हा त्याला लवकर रत्नागिरीला परतायचे होते पण माझे भाषण होईपर्यंत थांबला आणि जेवण न घेताच मला न सांगताच निघून गेला.मी फोन केला तेव्हा म्हणाला “मी केवळ तुझा सन्मान बघण्यासाठी आलो होतो.त्या आनंदानेच माझे पोट भरले.”
तसेच दीपावलीनिमित्त लांजा शहरातील फ्रेंडस् ग्रुप दीपोत्सवाचे आयोजन करतो.या दीपोत्सवानिमित्त देण्यात येणारा “आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार २०१९” मला जाहिर झाल्याचे या संस्थेचे समन्वयक विजय हटकर यांनी कळविले.तेव्हा हा सन्मान स्वीकारण्यासाठी सुद्धा रवी माझ्यासोबत लांज्याला आला होता.माझ्या सन्मानाचा आनंद माझ्यापेक्षाही रवीला अधिक होता. दुस–याच्या आनंदात आनंद पाहणे हा त्याचा जणू स्थायीभावच होता. कोरोना काळात त्याने अकरावी बारावीतल्या मित्रांना संपर्क साधून व्हाॅटस्अपचा ग्रुप बनविला.केवढा मोठा आनंद मिळवून दिला. त्यामुळे आम्ही मित्र सतत संपर्कात होतो.आताच्या जानेवारी- फेब्रुवारीत मी गावाला गेलो तेव्हा शिपोशी येथील काॅलेजला भेट दिली.रवी तेव्हाही हजर होता.चाळीस वर्षानंतर प्रथमत:च त्या शाळेत पाऊल ठेवताच डोळे भरून आले.तेव्हाच्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.रवी मुळेच मला माझ्या शाळेशी पुन्हा नाते जोडता आले. *माझ्यासारखे अनेक मित्र रवीचे आहेत त्यांच्यावरही त्यांने निखळ प्रेम केले असणार!कोकणी माणूस दुस-याचे मोठेपण स्विकारत नाही उलट तो छोटा कसा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो असे म्हणतात.रवीने आपल्या अनुकरणीय कृतीतून हे खोटे ठरविले आहे.तो तर अनेकांच्या माेठेपणाचा प्रसारक झाला होता. अशा दुर्मिळ गुणांचा मित्र अनेकांना पोरके करून गेला.* रवीच्या जाण्याने त्याच्या कुटुंबियांवर मोठे संकट कोसळले आहे ते पेलण्याची ताकद परमेश्वराने त्यांना द्यावी. स्वर्ग असेलच तर तो रवी साठीच असेल.त्या स्वर्गलोकी रवीच्या आत्म्यास चिरशांती लाभावी अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सुभाष लाड संपादक – मोडीदर्पण दिवाळी अंक