
ड्रॅगन फ्रूट लागवडीला चालना मिळण्यासाठी व ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी अनुदानाची योजना
ड्रॅगन फ्रूट लागवडीला चालना देण्यासाठी कृषी विभागाकडून पावले उचलली आहेत. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून अनुदान दिले जाणार असून त्यासाठी महाडिबीटी पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून केले आहे.
ड्रॅगन फ्रूट (कमलम) हे एक निवडुंग परिवारातील अत्यंत महत्वपूर्ण फळ आहे. ड्रॅगनफ्रूट या फळात अधिक प्रमाणात असणारी पोषक तत्व आणि ऍन्टीऑक्सीडेंटमुळे या फळास सुपर फ्रूट म्हणून ओळखले जाते. या फळात विविध औषधी गुण आहेत. या व्यतिरिक्त फॉस्फरस व कॅल्शियम यासारखे मिनरल्स अधिक प्रमाणात त्यात आढळतात. पाण्याची टंचाई निर्माण झाली, तरीही झाडे कायमची टिकून राहतात. तसेच या पिकाला रोग व किडीचा प्रादुर्भाव नगण्य असून पीक संरक्षणावर जास्त खर्च येत नाही. भारतीय बाजारपेठेत या फळाची मागणी व पिकाचे क्षेत्र वाढत आहे. या फळाचे क्षेत्र, मागणी, निर्यातक्षमता, आषधी व पोषक मुख्य बाबी लक्षात घेवून २०२१-२२ या वर्षापासून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून ड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण निश्चित केले आहे.
ड्रॅगनफ्रूट फळ पिकाची लागवड करण्यासाठी जमिनीची पूर्व मशागत झाल्यावर दोन झाडांमध्ये ३ मी बाय ३ मी, ३ मी बाय २.५ मी या अंतरावर खड्डे खोदून खड्याच्या मधोमध सिमेंट कॉंक्रीटचा किमान ६ फूट उंचीचा खांब व त्यावर कॉंक्रीटची फ्रेम बसवावी. सिमेंट कॉंक्रीट खांबाच्या एका बाजूला एक याप्रमाणे चार बाजूला चार रोपे लावता येतत.
ड्रॅगन फ्र्रूट फळपिकाची लागवड करण्यासाठी लागवड साहित्य, आधार पद्धत, ठिबक सिंचन, खते व पीक संरक्षण यासाठी ४ लाख प्रति हेक्टर प्रकल्प मुल्य ग्राह्य धरून ४० टक्के प्रमाणे रक्कम १ लाख ६० हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान तीन वर्षात ६०ः२०ः२० या प्रमाणात दिले जाईल. दुसर्या वर्षी ७५ टक्के व तिसर्या वर्षी ९० टक्के झाड जीवंत असणे अनिवार्य राहील. ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी www.mahadbtmahait.gov.in या महाडीबीटी पोर्टलवर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. याबाबत माहितीसाठी जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. www.konkantoday.com