महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या उपाध्यक्षपदी डॉ. तानाजीराव चोरगे

चिपळूण : सहकार, साहित्य, शिक्षण, कृषि, साहित्य, क्रीडा आदी विषयात नियमित सक्रीय वावर असलेले रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, ‘कृषिभूषण’ लेखक डॉ. तानाजीराव चोरगे यांची महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था (१९०६) असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या उपाध्यक्षपदी अभिनंदनीय निवड झाली आहे. या निमित्ताने कोकणला पहिल्यांदाच उपाध्यक्षपदाचा मान मिळाला आहे.

कथा, कादंबरी, नाटक, बँकिंग आदी विषयावरील चाळीसहून अधिक पुस्तके लिहिणाऱ्या डॉ. चोरगे यांचे झेप हे सुमारे आठशे पानांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. हे आत्मचरित्र वाचल्यावर एका सर्वसामान्य माणसाने स्वकर्तृत्वाने अनंत अडचणींवर मात करत घेतलेली सामर्थ्यशाली झेप आपणास अनुभवास येते. त्यांच्या लेखणीतून उतरलेले जीवनानुभव विविधांगी आहेत. उत्तम सामाजिक भान असलेल्या डॉ. चोरगे यांचे सहकार क्षेत्रातील काम आदर्शवत आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रगतीत त्यांच्या भक्कम नेतृत्वाचे मोठे योगदान आहे. शैक्षणिक क्षेत्रांत आणि शेतात रमणाऱ्या डॉ. चोरगे यांच्या साहित्यिक कार्याच्या गौरवार्थ गुहागर येथील ज्ञानरश्मि वाचनालयाने आपल्या सभागृहाला डॉक्टर तानाजीराव चोरगे सभागृह असे नाव दिले आहे. दोन वर्षापूर्वी चिपळूण येथे झालेल्या लेखक प्रकाशक साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करणाऱ्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरानेही आपले ‘सन्माननीय सदस्यत्व’ त्यांना प्रदान केले आहे. डॉ. चोरगे यांच्यासह ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि लेखक डॉ. विद्याधर अनास्कर व दिलीपराज प्रकाशनचे श्री. राजीव बर्वे यांचीही उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.

मसापचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार आणि जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते. प्रथमच परिषदेची ही सभा आँनलाईन घेण्यात आली. डॉ. चोरगे यांच्या उपाध्यक्षपदामुळे कोकणातील साहित्यिक चळवळीला बळ मिळेल असा विश्वास साहित्यप्रेमींना असल्याने कोकणातील साहित्य वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button