
प्रवाशांनी केलेला हंगामा पाहताच मध्य रेल्वेने सोडली पर्यायी गाडी
उन्हाळी सुट्टी हंगामासाठी कोकण मार्गावर एलटीटी-थिविम साप्ताहिक स्पेशल चालवण्यात येत आहे. मात्र शनिवारी रात्री १० वाजून १५ मिनिटांनी स्पेशल एलटीटी स्थानकात आलीच नाही. प्रवाशांकडून सातत्याने विचारणा केल्यानंतरही उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. अखेर संतप्त प्रवाशांनी हंगामा करताच मध्य रेल्वे प्रशासनाने तब्बल ७ तासानंतर पर्यायी विशेष गाडी सोडली. रविवारी पहाटे ५ वाजून १० मिनिटांनी सोडलेल्या विशेष गाडीमुळे कोकणात येणार्या प्रवाशांचे अतोनात हाल झालेे.उन्हाळी सुट्टी हंगामात नियमित रेल्वेगाड्यांसह उन्हाळी स्पेशल गाड्यांना होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस-थिविम उन्हाळी स्पेशल चालवण्यात येत आहे.दर शनिवारी एलटीटी स्थानकातून रात्री १० वा. १५ मिनिटांनी स्पेशल सुटते. मात्र, २० एप्रिल रोजी एलटीटी-थिविम स्पेशल निर्धारित वेळेत स्थानकात दाखलच झालेली नाही. प्रवाशांनी विचारणा केल्यानंतर स्पेशल मध्यरात्री २ वाजता सुटेल असे सांगण्यात आले.मात्र, या वेळेतही स्पेशल स्थानकात दाखल न झाल्याने संतप्त प्रवाशांनी एलटीटी-थिविम स्थानकासमोरील रेल्वे अधिकार्यांच्या दालनात जावून जाब विचारला. मात्र तरीदेखील समर्पक उत्तरे न मिळाल्याने प्रवासी आक्रमक झाले. जोपर्यंत एलटीटी थिविम स्पेशल सोडली जात नाही. तोपर्यंत स्थानकातून एकही गाडी मार्गस्थ होवू देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेत १ तास गोंधळ घातला.या गोंधळानंतर रेल्वे प्रशासनाने नमते घेत सेकंड सीटिंग श्रेणीतील गाडीऐवजी रविवारी पहाटे ५ वाजून १० मिनिटांनी थिविमसाठी पर्यायी स्लीपर श्रेणीतील गाडी सोडली. www.konkantoday.com