संततधार पावसामुळे महामार्गाची चाळण; अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला
खेड : गेले काही दिवस कोकणात कोसळत असलेल्या संततधार पावसामु चौपदरीकरणाचे काम सुरु असलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे पुरती वाट लागली आहे. ठिकठिकाणी चाळण झालेले पर्यायी मार्ग आणि घाटांमध्ये कोसळणाऱ्या दरडी यामुळे महामार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठीत धरुनच प्रवास करावा लागतो आहे. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही लक्ष दिले जात नसल्याने अधिकारी ठेकेदार कंपनीला पाठीशी तर घालतात नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे.
मुंबई गोवा महामार्गावर अनेक अवघड घाट आणि वळणे असल्याने हा मार्ग पहिल्यापासूनच धोकादायक मानला जातो. या मार्गावर आतापर्यंत अनेक जीवघेणे अपघात होवून अनेकांना आपला आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेकजण कायमचे जायबंदी झाले आहेत. पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडले की हा मार्ग
अधिकच धोकदायक होतो. शिवाय घाटामध्ये दरड रस्त्यावर येण्याच्याही घटना ही पावसाळ्यात वारंवार घडत असतात.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गाला लागलेले अपघातांचे ग्रहण कायमचे सोडविण्यासाठी या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. चौपदरीकरणाचे काम वेळेत झाले असते तर कदाचीत या मार्गाला लागलेले अपघातांचे ग्रहण सुटलेही असते. मात्र अनेक वर्षे उलटूनाही चौपदरीकरणाचे काम ५० टक्केही पुर्ण झाले नसल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या नशीबाचे भोग संपलेले नाहीत.महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरु झाल्यावर मुंबई गोवा महामार्गावरील अपघातांचा धोका टळेल अशी अपेक्षा होती. मात्र चौपदरीकरणाच्या कामादरम्यान ठेकेदार कंपन्यांनी केलेल्या निकृष्ट कामामुळे अपघातांचा धोका टळण्याऐवजी वाढला आहे.
या मार्गावरील कशेडी पायथा ते पशुराम घाट या दरम्यानच्या ४४ किलोमिटर रस्त्याच्या चौपदरीकरण कामाचा ठेका कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडे आहे. कंपनीकडून चौपदरीकरण कामाची सुरवात अगदी धुमधडाक्यात झाली मात्र आता कंपनीने आपले रंग दाखवायला सुरवात केली आहे.
चौदपदरीकरणाचे काम करताना ज्या ज्या ठिकाणी पर्यायी मार्गाची व्यवस्था आवश्यक आहे ते पर्यायी मार्ग ठेकेदार कंपनीने पक्के डांबराचे करायचे आहेत. चौपदरीकरणादरम्यान प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये हा त्या मागचा हेतू आहे. कंपनीने शासनाशी केलेल्या करारामध्ये तसा उल्लेखही आहे मात्र खेड तालुक्याच्या हद्दीत काम करणाऱ्या ठेकेदाराने केवळ पैसे वाचविण्यासाठी एकही पर्यायी मार्ग डांबराचा न बनविल्याने प्रवाशांना आदळत-आपटत प्रवास करावा लागतो आहे.
खेड तालुक्याच्या हद्दीत सध्या भरणे नाका आणि दाभीळ या ठिकाणी उड्डाण पुलांची कामे सुरु आहेत. त्यामुळे येथील वाहतुक पर्यायी माग वळविण्यात आली आहे. मात्र हे पर्यायी मार्ग डांबरा ऐवजी दगड मातीचे असल्याने या ठिकाणी आता केवळ खड्ड्यांचे साम्राज्य उरले आहे. दाभीळ येथे तर इतके खड्डे पडले आहेत की या खड्ड्यात वाहन घालताना चालकाच्या पोटात खड्डा पडल्याशिवाय रहात नाही. पावसाच्या पाण्यात या खड्ड्याचा चालकांना अंदाजही येत नसल्याने खड्ड्यात आदळून अपघातही होवू लागले आहे. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामावर लक्ष ठेवणारे बांधकाम विभागाचे श्रीकांत बांगर यांना महिन्याभरापुर्वी संपर्क केला असता, भरणे आणि दाभिळ येथील पर्यायी मार्ग आठ दिवसात डांबराचे केले जातील, तशा सुचना
संबधित ठेकेदार कंपनीला दिल्या आहेत असे सांगितले मात्र महिना उलटूनही खेड हद्दीतील पर्यायी मार्ग डाबराचे झालेले नसल्याने अधिकारी ठेकेदार कंपनीला पाठीशी तर घालत नाही ना अशी शंका यायला लागली आहे