आंबा घाटाचे नाव दख्खन घाट करण्याची देवरूखचे सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांची मागणी
रत्नागिरी- कोल्हापूर या मार्गावर साखरपा, मुर्शी, दख्खन गाव सोडल्यावर कोकण आणि पश्चिमेला जोडणारा आंबा घाट आहे. या घाटाचे नाव दख्खन घाट करण्याची मागणी देवरूखचे सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांनी केली आहे.
त्यांनी सांगितले की, या घाटाचा आणि आंबा गावाचा तसा संबध नाही. कारण रत्नागिरी जिल्हा हद्द आंबा गावाआधी संपते. असे असताना या घाटाला आंबा घाट हे नाव कसे? हा घाट दख्खन ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो. आंबा घाटाची जबाबदारी बांधकाम विभाग रत्नागिरी जिल्हा घेते. साखरपा मुर्शी व देवरूख पोलिस स्टेशन या क्षेत्रातील तपासकाम हाताळते. हा घाट रत्नागिरी जिल्ह्याची शान असताना हद्द नसलेल्या गावाच्या नावाने हा घाट प्रसिद्ध कसा? या घाटाला खरेतर आपण दख्खनचा घाट असेच म्हणावे, असे मत आर्ते यांनी व्यक्त केले आहे.
निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद या घाटातून जाताना घेता येतो. समुद्रसपाटीपासुन २ हजार फूट उंचीवर हा घाट सह्याद्री पर्वतरांगेचा एक भाग आहे. या घाटातील गायमुख हे बारमाही पाणी वाहणारे ठिकाण प्रसिद्ध आहे. या घाटातुन विशाळगडाची टेहळणी करता येते. घाटातून पूर्वी घोडेसवारी होत होती तेव्हा घोड्यांना पाणी पिण्यासाठी खास तळेही बांधण्यात आले आहे. या तळ्याची स्वच्छता देवरूखमधील काकडे अकॅडमी करते. या घाटाला आंबा घाट न म्हणता ‘दख्खनचा घाट’ असे नामकरण होणे महत्वाचे आहे, असे आर्ते यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
www.konkantoday.com