
नवरात्रोत्सवाच्या स्वागतासाठी रत्नागिरी जिल्हा सज्ज
जिल्ह्यात गणेशोत्सवानंतर आता सर्व भक्तांना नवरात्रीची आतुरता लागली आहे. नवरात्रोत्सवाला येत्या सोमवारपासून (ता. २२) सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात ४३६ सार्वजनिक व ६५ खासगी मिळून ५०१ ठिकाणी दुर्गामातेच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. नवरात्रानिमित्त शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठाही सजू लागल्या आहेत. दुर्गामातेची आरास करण्यासाठी लागणारे विविध साहित्य, नऊ रंगाच्या साड्या, गरबा, दांडियांसाठी लागणारे साहित्य विक्रीस ठेवण्यात आले आहे.
नवरात्र अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली असून, मूर्तिकारांकडून दुर्गादेवी मूर्तीवर अखेरचा हात फिरवला जात आहे. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. नऊ दिवसांच्या उत्सवाची सांगता दहाव्या दिवशी म्हणजेच विजयादशमी-दसऱ्याला होते. जिल्ह्यात ४२४ सार्वजनिक ठिकाणी घटस्थापना केली जाणार आहे तर १९ हजार ३१५ ठिकाणी खासगी घट बसवण्यात येणार आहेत.
यावर्षी घटस्थापनेपासून अकराव्या दिवशी दसरा आहे. या निमित्त ग्रामीण भागातील विविध मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. नऊ दिवस विविध कार्यक्रमांचे मंडळांकडून दांडिया-गरबाचे आयोजन करण्यात आले आहे.




