जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्याकडून रत्नागिरीकरांच्या चांगल्या अपेक्षा
अनिकेत पटवर्धन यांनी घेतली भेट
रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाकरिता भाजयुमोचे सहकार्य
रत्नागिरी– रत्नागिरी जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत नूतन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी स्वतः लक्ष घालून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी केले. डॉ. पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आज अनिकेत पटवर्धन यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. आमदार प्रसाद लाड, आमदार रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील विकासकामासाठी भाजयुमो नेहमीच सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. त्यामुळे विकासाच्या प्रश्नांवर मंत्र्यांकडेही पाठपुरावा करू, असे त्यांनी सांगितले.
यानंतर पत्रकारांशी बोलताना अनिकेत पटवर्धन म्हणाले की, कोरोनाच्या कालावधीमध्ये गेल्या दीड वर्षात रत्नागिरी जिल्ह्यात आरोग्य व्यवस्था अपुरी असल्याचे अनेकदा दिसून आले. आहे. जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये यामध्ये सुमारे ४० टक्के पदे रिक्त आहेत. तज्ञ डॉक्टर्स परिचारिका नाहीत. याबाबत अनेकदा दाद मागूनही कोणत्याही प्रकारची भरती करण्यात आलेली नाही. यामुळे तात्काळ ही रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा करावा. रत्नागिरी जिल्ह्यात महामार्गाचे काम सुरू आहे. मुंबई ते गोवा हा मार्ग चौपदरीकरणाचे काम चालू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ९९ टक्के काम पूर्ण झालेले आहे, रत्नागिरीत व लांजा तालुक्यातील काम रखडलेले आहे. या कामाकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे, असे पटवर्धन म्हणाले.
रत्नागिरी शहराची सुधारित नळपाणी योजना पाच वर्षे रखडली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही पाणी योजना मंजूर केली होती. मात्र रत्नागिरी नगरपरिषदेने अतिशय संथ गतीने हे काम सुरू ठेवले आहे. रत्नागिरी शहरांमध्ये त्याकरिता रस्ते खणून ठेवलेले आहेत. खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे रत्नागिरीकर संतप्त झाले असून सध्या पावसाळ्याच्या कालावधीत अपघात होत असून रस्ते सुधारणा संथगतीने सुरू आहे, याकरिता तात्काळ पावले उचला, याकडे पटवर्धन यांनी लक्ष वेधले.
रत्नागिरी जिल्ह्यातील खाड्यामधील गाळ काढण्याकरिता कालबद्ध कार्यक्रम, मध्यवर्ती एसटी बसस्थानकाचे दोन वर्षे रखडलेले काम, कोरोना रुग्णांच्या संख्येतील गोलमाल, चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाही, तसेच ज्या बागा वीस ते पंचवीस वर्षे निगा करून वाढवल्या होत्या त्या बागा उदध्वस्त झाल्यामुळे दापोली कृषी विद्यापीठाची मदत घेऊन या शेतकऱ्यांसाठी ठोस योजना केली पाहिजे.
चिपळुणमधील तिवरे धरण वाहून गेले आणि यामुळे धरणक्षेत्रातील घरे वाहून गेल्यामुळे यातील बेघरांना शासनाकडून घरे देण्यात आली. परंतु या घरांचा दर्जा तपासण्यात यावा आणि काही घरांना गळती असल्यास या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पटवर्धन यांनी केली.
कोकण विभागीय मंडळाला अद्याप स्वतंत्र इमारत मिळालेली नाही. अजूनही भाड्याच्या जागेत हे कार्यालय सुरू आहे. त्यामुळे शासकीय जागेत इमारत उभी करावी, लोटेमधील कारखान्यांच्या कालबाह्य यंत्रांचे ऑडिट करावे, तसेच फायर ऑडिट नको, कालबाह्य यंत्रसामग्री आणि उत्पादन करण्यासाठी वापरण्यात येणारी जुनाट आणि दोषपूर्ण साधने यांचीही काटेकोरपणे तपासणी होणे आवश्यक आहे. कोयनेचे अवजल प्रश्न मार्गी लागलेले नाही. तसेच सर्व तालुक्यांच्या ठिकाणी भूमिगत वीजवाहिन्यांची गरज आहे. बंदराचा विकास झालेला नाही, ही बंदरे गाळाने भरली आहेत. यातील गाळ काढून येथून जहाज वाहतूक व पर्यटन सुरू करता येईल. रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना पर्यटनस्थळांची माहिती देण्याकरिता गाईडची आवश्यकता आहे. एमटीडीसीने गाईड प्रशिक्षण योजना अमलात आणल्यास स्थानिक युवकांना रोजगारही मिळेल. याकडे लक्ष देण्याची मागणी अनिकेत पटवर्धन यांनी केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात इंटरनेटचा प्रश्न गंभीर आहे. विविध कारणांसाठी रस्ते खोदाई महामार्ग चौपदरीकरण दुर्गम भाग अशा कारणांमुळे इंटरनेट मिळणे कठीण होते, सुयोग्य स्पीड नसल्यामुळे मुलांना सध्या ऑनलाईन शिक्षणही घेता येत नाही. त्याकरिता राज्य शासनाने प्रत्येक ठिकाणी जागा उपलब्ध करून दिल्यास टॉवर उभारणी शक्य होईल. सर्व शेतकरी आंबा, काजू बागायतदार हे फळ विक्रीकडे जास्त लक्ष देतात. परंतु फळप्रक्रिया उद्योगातून मोठी आर्थिक उलाढाल होऊन येथेच रोजगार मिळेल, याकरिता जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी लक्ष घालण्याची मागणी अनिकेत पटवर्धन यांनी केली.
रत्नागिरी शहरामध्ये हेल्मेटची प्रचंड सक्ती केली जाते. रत्नागिरीसारख्या छोट्या शहरामध्ये एवढी सक्ती आवश्यक नाही. पोलिस दंडवसुली करतात. परंतु सध्या कोरोनाच्या काळामुळे नोकऱ्या, रोजगार गेले, अशा स्थितीत अशी सक्ती करू नये, शहराच्या बाहेर सक्ती करावी. या प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी अनिकेत पटवर्धन यांनी केली. खासगी शाळांमधील शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न आहे. तसेच ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली सर्व प्रकारचे शुल्क आकारले जात आहे. विद्यार्थ्यांवर ही सक्ती करू नये, असेही पटवर्धन म्हणाले.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कातळ चित्रांचे संवर्धन आणि त्यातून शाश्वत पर्यटन विकासासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा अनिकेत पटवर्धन यांनी व्यक्त केली. रत्नागिरीतील निसर्गयात्री संस्थेने कातळशिल्पांची शोधमोहिम राबवली आहे. मात्र त्याकरिता निधीची तरतूद व्हावी व पुरेसा निधी मिळाल्यास ही कातळशिल्पे राज्य संरक्षित करून तेथे पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळवून देता येणे शक्य आहे. याकडे अनिकेत पटवर्धन यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.