
मालवण दांडी समुद्रकिनाऱ्यावर आढळून आलेल्या जाळ्यात अडकलेल्या कासवाची स्थानिक पारंपारिक मच्छिमारांनी जाळ्यातून केली सुटका.
मालवण दांडी येथील झालझुलवाडी समुद्रकिनाऱ्यावर आढळून आलेल्या जाळ्यात अडकलेल्या कासवाची स्थानिक पारंपारिक मच्छिमारांनी जाळ्यातून सुटका करून जीवदान दिले. हे कासव दुर्मिळ असे जगातील सर्वात मोठे कठीण कवच असलेले आणि मोठ्या डोक्याचे लॉगरहेड समुद्री कासव असल्याची माहिती युथ बिट्स फॉर क्लायमेट या संस्थेचे सदस्य अक्षय रेवंडकर यांनी दिली.
दांडी झालझुलवाडी येथील समुद्र किनाऱ्यावर शुक्रवारी संध्याकाळी समुद्राच्या लाटांमध्ये किनाऱ्यालगत जाळ्यात (घोस्ट नेटमध्ये) कासव अडकलेल्या स्थितीत असल्याचे संतोष खवणेकर, प्रविण(बाळा) पराडकर, महेंद्र कुबल, नारायण(दादू) लोणे या पारंपरिक मच्छिमारांच्या निदर्शनास आले. प्रविण पराडकर, महेंद्र कुबल यांनी लगेच पाण्यात जाऊन ते कासव जाळ्यासह उचलून किनाऱ्यावर आणले. त्यानंतर संतोष खवणेकर यांनी चाकूच्या साहाय्याने जाळे कापून कासवाची जाळ्यातून सुटका केली. त्यानंतर नारायण लोणे यांनी त्या कासवास सुखरूप समुद्रात सोडून जीवदान दिले.