
विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणामध्ये खो तत्काळ मोबाइल दुकाने उघडण्याचा आदेश काढा- अनिकेत पटवर्धन
रत्नागिरी- कोरोना महामारी मुळे शाळा बंद असल्या तरी सुद्धा ऑनलाइन शिक्षण मोठ्या प्रमाणात चालू आहे. याकरिता विद्यार्थ्यांना चांगल्या इंटरनेट आणि मोबाईलची गरज आहे, परंतु सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व मोबाइल दुकाने बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना मोबाईल उपलब्ध होत नाही. तसेच अनेकांना मोबाईल दुरुस्त सुद्धा करून घेता येत नाहीये. त्यामुळे तात्काळ मोबाईलची दुकाने उघडण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने द्यावे, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी केली आहे.
बाजारपेठा बहुतांशी खुल्या झाल्या आहेत. परंतु रत्नागिरीतील मोबाईलची दुकान मात्र अद्याप उघडलेली नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांना मोबाईल खरेदी करता येत नाही. ग्रामीण व शहरी भागात ही मोठी समस्या आहे. काही जणांचे मोबाइल बंद पडले आहेत, ते दुरुस्त करून घ्यायचे आहेत, पण दुकानदार नाही, स्पेअर पार्ट सुद्धा मिळत नाहीत, याबाबत अनेक पालकांनी, तसेच विद्यार्थ्यांनी युवा मोर्चाशी संपर्क साधला आहे, असे अनिकेत पटवर्धन म्हणाले.
मोबाइल दुकान चालकांनी बंदी असताना दुकान उघडल्यास त्यांना दहा हजार रुपयांचा दंड ठोकला जातो. मात्र हा दंड भरणे शक्य नसल्यामुळे मोबाईल विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवली आहेत. मोबाईल मिळत नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेताना अडचणी येत आहेत. बऱ्याच पालकांना विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेत घरी थांबावे लागते त्यामुळे कामावर जाता येत नाही. अनेकांनी मुलांच्या शिक्षणासाठी नोकरी सुद्धा सोडली आहे. त्यामुळे तात्काळ मोबाईलची दुकाने उघडण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने द्यावा, यापूर्वी दुकाने बंद असतानाही या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या वाढतच होती. आता दुकाने उघडल्यानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झालेली नाही. त्यामुळे मोबाईलचे दुकान उघडल्यास कोरोना वाढेल की काय अशी भीती जिल्हा प्रशासनाला वाटते का? असा सवाल करून तात्काळ मोबाईलची दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी अनिकेत पटवर्धन यांनी केली आहे.
www.konkantoday.com