नारायण राणेंसारखा एक हिरा केंद्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये बसला हा कोकणाचा सन्मान – माजी आमदार बाळ माने
नारायण राणेंसारखा एक हिरा केंद्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये बसला हा कोकणाचा सन्मान असून, कोकणी तसेच महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत, आणि खऱ्या अर्थाने राणेसाहेब कोकणाला न्याय देतील, असं प्रतिपादन भाजप नेते माजी आमदार बाळासाहेब माने यांनी केलं आहे, ते रत्नागिरीत बोलत होते.
यावेळी बाळासाहेब माने म्हणाले की, गेली सात वर्ष मोदी सरकारचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चाललं आहे. आगामी काळात कोकणाला आणि महाराष्ट्राला चांगल्या प्रकारचं नेतृत्व केंद्र सरकारमध्ये मिळालं पाहिजे, यादृष्टीने जे काही बदल करण्यात आले, त्यामध्ये कोकणाला 2 कॅबिनेट मंत्रिपद मिळाली आहेत, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित भाई शहा तसेच देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत दादा पाटील या सर्वांना आपण धन्यवाद देत असल्याचं माने यांनी यावेळी सांगितलं.
तसेच नारायण राणेंसारखा एक हिरा केंद्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये बसला हा कोकणाचा सन्मान असून, हे सगळं यश कोकणाचं आहे, असं माजी आमदार बाळ माने यावेळी म्हणाले.
दरम्यान गेली 25 वर्ष मी राणे साहेबांना जवळून ओळखत आहे. कोकणच्या विकासाच्या धडाक्याला खरी सुरुवात नारायण राणे यांच्यामुळेच झाली. मधल्या काळात नारायण राणे साहेबांच्या राजकिय प्रवासात काही चढउतार आले. पण आज राणे साहेब भाजपचे राज्य सभेचे खासदार आहेत. मध्यंतरी अमित भाई शहा जेव्हा सिंधुदुर्गमध्ये मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाला आले तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, आणि त्या वाचनाची पूर्तता राणे साहेबांच्या शपथविधीमुळे झाली. त्यांना जे खातं मिळालं आहे सूक्ष्म आणि लघु मध्यम उद्योग, हे अतिशय चांगल्या प्रकारचं खातं आहे. देशाची जी निर्यात आहे त्यामध्ये या खात्याचा खूप मोठा वाटा असल्याचं माने यावेळी म्हणाले.
माने म्हणाले की, महाराष्ट्र तसेच कोकणच्या विकासाकरीता राणे साहेबांचं नेहमीच झुकतं माप असतं. त्यामुळे त्यांच्यावर ही नवीन महत्त्वाची जबाबदारी आल्यामुळे आम्हा सर्व कार्यकर्त्यांना अत्यंत आनंद झाला आहे. राणे साहेब या खात्याचा अल्पावधीतच अभ्यास करून एक चांगल्या प्रकारची लघु उद्योगांची फळी कोकणामध्ये निर्माण करतील. त्यामुळे नवीन रोजगार निर्मिती होईल, दरडोई उत्पन्न वाढेल, असा विश्वास आपल्याला असल्याचं बाळ माने यावेळी म्हणाले. राणे साहेबांमुळे कोकणी तसेच महाराष्ट्रातील माणसाच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. आणि खऱ्या अर्थाने कोकणाला ते न्याय देतील असं म्हणत माने यांनी राणे साहेबांच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत..