एकटेच लढणार आहात का? तुमचा निर्णय झाला असेल तर तसे स्पष्ट सांगा ,शरद पवार यांचा काँग्रेस नेत्यांना सवाल
तुम्ही खरंच सगळ्या निवडणुका एकटेच लढणार आहात का? तुमचा निर्णय झाला असेल तर तसे स्पष्ट सांगा, या शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आपली नाराजी काँग्रेस नेत्यांकडे व्यक्त केल्याचे समजते. काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी सायंकाळी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.गेल्या काही दिवसापासून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यावरून सुरू असलेला गदारोळ आणि त्यातून महाविकास आघाडीमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता, या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. पक्ष वाढवण्याच्या भाषेविषयी आपल्या मनात कुठलीही शंका नाही. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. तो वाढलादेखील पाहिजे. मात्र, ज्या पक्षांसोबत आपण सत्तेत आहोत ते पक्ष दुखावले जाणार नाहीत, सरकारमध्ये कटुता येणार नाही, अशा गोष्टी आपण टाळायला हव्यात, अशा शब्दात पवार यांनी स्पष्टपणे स्वतःचे मत सांगितल्याचे वृत्त आहे.
www.konkantoday.com