
अखेर ‘मन्नत’ पूर्ण; आर्यन खानची तुरुंगातून सुटका
मुंबई – ड्रग्ज केस प्रकरणी मागील 26 दिवसांपासून पोलीस कोठडीत असणारा अभिनेता शारुख खान याचा मुलगा ‘आर्यन खान’ अखेर आज (दि. 30) बाहेर आला आहे. दोन दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. उच्च न्यायालयाने आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना जामीन दिला आहे.
सर्वांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने जामिनावर अंतिम निर्णय दिला. त्यामुळे आर्यन खानची दिवाळी तुरुंगात न होता आपल्या घरी मन्नतवर होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, जामीन मिळाल्यानंतर सुद्धा कोर्टाची ऑर्डर मिळाली नसल्याने आर्यनला कालची (दि. 29) आणखी एक रात्र तुरुंगात काढावी लागली होती.
त्यानंतर आज सकाळी साडे पाच वाजता आर्थर रोड तुरुंगाची जामीन पत्रपेटी उघडली गेली. त्यानंतर जामीन अर्जाची प्रत तुरुंगातील अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली. आणि त्यानंतर अखेर आज आर्यन खानची आर्थर रोड तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. आर्यनला घरी आणण्यासाठी स्वतः किंग खान आणि पत्नी गौरी खान आर्थर रोड तुरुंगात गेले होते.
www.konkantoday.com