
ईडीने बँकेवर कोणत्याही प्रकारे नोटीस बजावली नसल्याचं सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत यांचे स्पष्टीकरण
अंमलबजावणी संचनालयानं म्हणजेच ईडीनं (ED) जरंडेश्वर साखर कारखान्याच्या कर्जप्रकरणी पुणे आणि सातारा जिल्हा बँके पाठोपाठ सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नोटीस दिल्याची चर्चा सुरु झाली होती. जरंडेश्वर साखर कारखान्याला कर्ज दिल्या प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला देखील ईडीकडून पत पुरवठ्याबाबत नोटीस आल्याने खळबळ उडाली होती. मात्र, जिल्हा मध्यवर्ती बँकेचा जरंडेश्वर साखर कारखान्याशी थेट संबंध नसून पुणे जिल्हा बँकेमार्फत केलेल्या पतपुरवठया संदर्भात ईडीकडून माहितीसाठी पत्र आले असून ईडीने बँकेवर कोणत्याही प्रकारे नोटीस बजावली नसल्याचं स्पष्टीकरण जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत यांनी दिलं आहे.जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत यांनी राजकीय विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या बातम्यांवर बँकेच्या ठेवीदारांनी विश्वास ठेवू नये, असं आवाहन केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व ठेवीदारांच्या ठेवी या बँकेत सुरक्षित असल्याची माहिती ही सतिश सावंत यांनी दिली आहे.
www.konkantoday.com