महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयाच्या वतीने ‘महाराष्ट्राचे मास्टरशेफ’ या रेसीपी स्पर्धेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन
राज्यातील खाद्यसंस्कृती आणि पाककलेला चालना देणे तसेच या माध्यमातून देश-विदेशातील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयाच्या वतीने ‘महाराष्ट्राचे मास्टरशेफ’ या रेसीपी स्पर्धेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पर्यटन संचालक डॉ.धनंजय सावळकर यांनी दिली.
स्पर्धेतील 15 सर्वोत्कृष्ट रेसीपींना प्रत्येकी 10 हजार रुपये, 40 रेसीपींना प्रत्येकी 5 हजार रुपये तर उत्कृष्ट 100 रेसीपींना प्रत्येकी 2 हजार रुपयांची बक्षीसे दिली जातील. शिवाय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाकडून सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.स्पर्धेत सहभागासाठी www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर इत्यंभूत माहिती उपलब्ध आहे. https://bit.ly/MaharashtracheMasterchef या लिंकवर माहिती तसेच अर्ज उपलब्ध आहे.
महाराष्ट्राची खाद्य संस्कृती ही देश आणि जगभरात लोकप्रिय आहे. राज्याच्या विविध भागातील मालवणी, आग्री-कोळी, खान्देशी, कोल्हापुरी, वऱ्हाडी अशा विविध खाद्यसंस्कृती लोकप्रिय आहेत. पर्यटक महाराष्ट्रात आल्यानंतर स्थानिक खाद्यपदार्थांचा आवर्जून आस्वाद घेतात. आता महाराष्ट्रातील अशा विविध रेसीपी देश आणि जगभरातील पर्यटकांपर्यंत पोहोचवून त्यांना चालना देण्यात येणार आहे. यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्याअनुषंगानेच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात राज्याच्या विविध भागातील पाककला प्रेमींनी सहभागी होऊन महाराष्ट्राचे मास्टरशेफ बनावे, असे आवाहन संचालक डॉ.सावळकर यांनी केले आहे.
www.konkantoday.com