
रत्नागिरीतील चंपक मैदानावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्यांना जामीन नाकारला
रत्नागिरी : तीन महिन्यांपूर्वी शिमगोत्सव सुरू असताना शहराजवळील चंपक मैदानात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याची घटना उघडकीस आली होती. यातील तीन संशयितांनी जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने बुधवारी 1 जून रोजी जामीन अर्ज नाकारले आहेत. अत्याचाराची ही घटना 9 मार्च 2022 रोजी रात्री 11.30 वा.सुमारास घडली होती. तन्वीर वस्ता (वय 22, राहणार राजिवडा), अनिकेत प्रकाश नाखरेकर (वय 24) आणि ॠषिकेश मधुकर टिकेकर (वय 22, दोन्ही राहणार निवखोल, रत्नागिरी) अशी या तिघांची नावे आहेत. शिमगोत्सवात अल्पवयीन पीडित मुलगी होळी पाहण्यासाठी घराबाहेर पडली होती. याचा गैरफायदा घेत यातील एका संशयिताने तिला दुचाकीवरून चंपक मैदानात नेले होते. त्यावेळी त्याचे दोन मित्रही तिथे आले होते. त्यानंतर तिघांनीही तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान ही बाब स्थानिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी शहर पोलिसांना याची खबर दिली होती. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांनाही अटक करून तिघांवरही पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने त्यांना प्रथम पोलिस कोठडी सुनावली. नंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. या तिघांनीही न्यायालयात जमिनासाठी अर्ज केला होता. परंतु, 1 जून रोजी न्यायालयाने तिघांचेही जामीन अर्ज नाकारले.