
ज्येष्ठ रंगकर्मी, बांधकाम व्यावसायिक प्रफुल्ल घाग यांचे अकाली निधन
रत्नागिरीतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, नाट्य, सिने, मालिका क्षेत्रातील नामवंत कलावंत प्रफुल्ल सदाशिव घाग (५८) यांचे उपचारादरम्यान निधन झाले.
मेंदूत मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने प्रफुल्ल घाग यांना रत्नागिरी शहरातील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने वैद्यकीय अधिकार्यांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुढील उपचाराकरिता कोल्हापूर शहरातील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
प्रफुल्ल घाग यांनी अनेक नाटके, चित्रपट मालिकांमध्ये काम केले होते. त्यांची प्रमुख भूमिका असलेला एक चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. राज्य नाट्य स्पर्धेत पहिल्या आलेल्या निर्वासित नाटकात त्यांनी अभिनयाचे रौप्यपदक मिळवले होते. सन मराठी वाहिनीवरील वेतोबा मालिकेत त्यांनी भूमिका बजावली आहे. स्टार थिएटर या नाट्यसंस्थेचे ते संस्थापकदेखील होते. क्राईम मालिकेत त्यांनी यापूर्वी काम केले होते. दशक्रिया या मराठी चित्रपटातील त्यांची भूमिका सर्वोत्तम ठरली होती. मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी कार्यकारिणीचे ते सदस्य होते.
कोकणनगर येथील स्मशानभूमीत शनिवारी सकाळी प्रफुल्ल घाग यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवर, नाट्यकमी, हितचिंतक, नातेवाईक, सहकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आदी मान्यवर अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. प्रफुल्ल घाग यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रफुल्ल घाग यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. www.konkantoday.com