कोकणातील पत्रकारितेचे चालता-बोलता विकीपीडिया असलेले श्री.रघुनाथ विश्वनाथ तथा भाऊ सिनकर यांचे दुःखद निधन
पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी स्व.भाऊ सिनकर यांना वाहिली आदरांजली
कोकणातील जेष्ठ वृत्तपत्र
छायाचित्रकार, दै.कुलाबा दर्पणचे संस्थापक-संपादक, कोकणातील पत्रकारितेचे चालता-बोलता विकीपीडिया असलेले श्री.रघुनाथ विश्वनाथ तथा भाऊ सिनकर यांना आज सकाळी अल्पशा आजाराने देवाज्ञा झाली.
त्यांच्या जाण्याने कोकणातील पत्रकारितेची न भरून येणारी हानी झाली आहे.
स्वाभिमानी बाणा , तत्वनिष्ठ पत्रकार असलेल्या भाऊंनी तत्त्वांशी आणि विचारांशी कोणतीही तडजोड न करता प्रतिकूल परिस्थितीतही दैनिक कुलाबा दर्पण खंबीरपणे सुरू ठेवले, यशस्वीपणे चालविले.
अगदी आर्थिक ओढाताणीच्या परिस्थितीतही त्यांनी कधी हार न मानता झुंज चालू ठेवली, एखाद्या योध्याप्रमाणे अखेरपर्यंत लढले.
प्रतिकूल परिस्थितीतही भाऊ सतत हसतमुख असत. विविध शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांपासून ते शिपायापर्यंत तसेच समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्तींशी त्यांचे अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध होते. कुठेही फिरायचे असले तरी त्यांनी शासनाच्या लाल परीची साथ कधी सोडली नाही, ते एसटीतून राज्यभर प्रवास करायचे.
त्यांचे अनेकांसोबत अतिशय स्नेहपूर्ण संबंध राहिले. सर्वांना त्यांचे नेहमीच सहकार्य लाभले. रायगड जिल्ह्याच्या विकासात्मक जडणघडणीत भाऊंनी पत्रकारितेच्या माध्यमातून केलेल्या लिखाणाचे अमूल्य योगदान राहिले आहे. पत्रकारितेतील उत्कृष्ट कार्याबद्दल अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. महाराष्ट्रात ज्या ज्येष्ठ पत्रकारांना शासनाची “बाळशास्त्री जांभेकर जेष्ठ पत्रकार सन्मान योजना” मंजूर करण्यात आली होती, त्यात भाऊ सिनकर हे रायगड जिल्ह्यातील एकमेव पत्रकार होते.
अशा तत्वनिष्ठ, समृद्ध विचारसरणीचे, रायगडचे पत्रकारितेतील वैभव, आदर्श पत्रकार व्यक्ती असलेल्या भाऊंना माहिती व जनसंपर्क महासंचालनालय राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याची पालकमंत्री या नात्याने मी विनम्र अभिवादन करून ईश्वरचरणी प्रार्थना करते की, स्वर्गीय भाऊंच्या आत्म्याला चिर:शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना भाऊंच्या जाण्याचे दुःख पचविण्याची शक्ती मिळो असे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे
www.konkantoday.com