
धरणाची संपुर्ण डागडुजी होत नाही तो पर्यंत परिसरातील ग्रामस्थांवर टांगती तलवार
मंडणगड तालुक्यातील पंदेरी धरणाला लागलेली गळती थांबविणात प्रशासनाला तुर्तास यश आले असले तरी. Dcधोका अद्याप टळलेला नाही. पावसाचा जोर वाढला तर धरणातील पाण्याची पातळी वाढून पुन्हा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे जो पर्यंत धरण पुर्ण रिकामे होत नाही तो पर्यंत धोका पुर्णपणे टळला आहे असे समजून चालणार नाही.
मंडणगड तालुक्यातील पंदेरी धरणाचे काम १९९५ साली पुर्ण झाल्यानंतर या धरणामध्ये पाणी साठा करण्यात सुरवात करण्यात आली. ४.०१ द.ल.घ.मी साठवण क्षमता असलेल्या या धरणामध्ये मुबलक पाणीसाठा असला तरी धर गाचे दोन्ही कालवे गाळात रुतलेले असल्याने धरणातील पाण्याचा एक थेंबही सिंचनासाठी वापरला जात नव्हता. त्यामुळे या धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या घोसाळे, पंदेरी, बहिरवली, कोरगाव व दंडनगरी येथील शेतकऱ्यांची अवस्था धरण उशाला आणि कोरड घशाला अशीच होती.
गेले काही दिवस धरणक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पंदेरी धरण पुर्णक्षमतेने भरल्यानंतर या धरणाच्या विहिरीजवळ धरणाला गळती लागली आणि धरणाखालील गावांना धोका निर्माण झाला. ५ जुलै रोजी चौकीदार जाधव हे धरणाच्या पाण्याची पातळी आणि पर्जन्यमान मोजण्यासाठी गेले तेव्हा त्यांना विहिरीजवळ धरणाला भगदाड पडल्याचे निदर्शनास आले. ही बाब त्यांनी तात्काळ सहाय्यक कार्यकारी अभियंता गोविंद श्रीमंगले यांच्या कानावर घातली आणि प्रशासनाची धावपळ सुरु झाली.
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटून उडालेल्या हाहाकाराच्या आठवणी ताज्या असल्याने प्रशासनाने तात्काळ खबरदारी घेत धोका निर्माण झालेल्या पंदेरी रोहीदासवाडी आणि बौद्धवाडी येथील सुमारे २०० कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले. त्याचप्रमाणे पाटबंधारे विभागाच्या यांत्रिकी विभागाने धरणाला लागलेली गळती थांबविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु करतानाच धरणातील पाणीपातळी कमी करण्यास सुरवात केली.
पाटबंधारे खात्याच्या यांत्रिकी विभागाने दोन दिवस रात्रंदिवस केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आणि धरणातील पाणी पातळी कमी होताच धरणाला निर्माण झाला धोका तुर्तास टळला. सद्यस्थितीत धरणातील पाण्याची पातळी ११५.६० इतकी आहे. परंतू ज्या ठिकाणी धरणाला गळती लागली होती त्या ठिकाणी पाण्याची पातळी पोहचत नसल्याने धरणाला तूर्तास तरी कोणताही धोका उरलेला नाही.
धरणाला निर्माण झालेल्या धोका टाळण्यात प्रशासनाला यश आले असले तरी पावसाचा जोर वाढला तर धरणाची पाणीपातळी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. पाणी पातळी वाढली तर धोका संभवण्याची शक्यताही नाकारता येत नाही त्यामुळे तुर्तास धोका टळला असला तरी धरण पुर्ण रिकामे होवून धरणाची संपुर्ण डागडुजी होत नाही तो पर्यंत धोका टळला असे समजणे शहाणपणाचे ठरणार नाही.
www.konkantoday.com

