महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एवढ्या मोठ्या मनाचा नाही’-केंद्रीय मंत्री नारायण राणे
मोदींच्या मंत्रिमंडळात थाटात शपथ घेतलेल्या मराठमोठ्या नारायण राणेंनी आज आपल्या खात्याचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताना राणेंंनी नोंदबुकमध्ये ‘ओम श्रीगणेशा’ लिहित आपल्या नव्या इनिंगला सुरुवात केली. त्याचबरोबर त्यांनी सेनेविरोधातही श्रीगणेशा केला. पदभार स्वीकारलेल्या खुर्चीवरुनच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पहिला वार केला. ‘मला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या पण उद्धव ठाकरेंनी शुभेच्छा दिल्या नाहीत. कारण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एवढ्या मोठ्या मनाचा नाही’, असं म्हणत राणेंनी मंत्री झाल्यावर पहिल्यांदाच उद्धव यांच्यावर निशाणा साधला.
शिवसेनेला अंगावर घेण्यासाठीच राणेंना केंद्रात मंत्रिपद देण्यात आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. खरं खोटं येणारा काळ सांगेल, पण त्याची झलक राणेंनी पदभार स्वीकारताच दाखवली. राणे म्हणाले, ‘माझं बऱ्याच प्रमुख नेत्यांनी अभिनंदन केलं, चांगलं काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. शरद पवारांनी फोन करुन अभिनंदनही केलं आणि चांगलं काम करा म्हणून शुभेच्छाही दिल्या पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एवढ्या मोठ्या मनाचा नाही’, असा एकेरी वार राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केला. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना राणेंनी हा वार केला.
www.konkantoday.com