
आंतरमहाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धेतआदित्य, स्वरा, सार्था, हर्ष, अंतिम फेरीत
रत्नागिरी : नवोदित गायक कलाकारांसाठी दरवर्षी होणाऱ्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राची आंतरमहाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धेची रत्नागिरी केंद्राची प्राथमिक फेरी नुकतीच पार पडली. या केंद्रातून आदित्य, स्वरा, हर्ष आणि सार्था हे चौघे मुंबई येथे होणाऱ्या अंतिम फेरीत दाखल झाले आहेत.
प्राथमिक फेरीत राजापूर, चिपळूण, देवगड, संगमेश्वर, रत्नागिरी येथील महाविद्यालयांमधून १८ स्पर्धक सहभागी झाले होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेतून आदित्य आनंद लिमये (वि.स. गांगण महाविद्यालय, रत्नागिरी), स्वरा अमित भागवत (टी. पी. केळकर सायन्स ज्युनिअर कॉलेज, रत्नागिरी), हर्ष महेश बोंडाळे आणि सार्था मनिषा नरेंद्र गवाणकर (अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी या स्पर्धकांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. स्पर्धेचे परीक्षण राम तांबे आणि श्रीमती अनिता कान्हेरे-आगाशे यांनी केले. स्पर्धेकरिता प्रथमेश शहाणे (तबला) आणि मंगेश मोरे (संवादिनी) यांनी संगीतसाथ केली. यावेळी अभिनेते आणि दादर-माटुंगा केंद्राचे कार्यवाह सतीश जोशी हे उपस्थित होते. स्पर्धेची अंतिम फेरी मुंबईत दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रात ११ जानेवारीला होणार आहे.




