लावण्या अर्ध्यावर आल्या असतानाच पावसाने दडी मारल्याने कोकणात लावण्या खोळंबल्या
खेड : लावण्या अर्ध्यावर आल्या असतानाच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सुरवातीला पाऊस चांगला झाल्याने शेतकयांच्या लावणीची लगबग सुरु झाली होती. मात्र अचानक पावसाने दडी मारल्याने शेताच्या बांधावर बसून पावसाची वाट पाहणायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
कोकणातील मुख्य पीक असलेली भात शेती ही पूर्णपणे पावसाच्या लहरीपणावर अवलंबून आहे पाऊस चांगला झाला तर शेतकऱ्यांच्या शेतात चांगलं पीक येत नाहीतर वर्षभर काबाडकष्ट करूनही शेतकऱ्याच्या हाताला फारसे काही लागत नाही. त्यामुळे कोकणातील पारंपरिक शेतीकडे आता शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
यावर्षी पावसाचे आगमन वेळेत झाल्याने शेकऱ्यांच्या पेरण्या वेळेत उरकल्या होत्या. पुढील पंधरा दिवस पाऊस चांगला राहिल्याने शेतकऱ्यांनी लावणीच्या कामालाही वेळेत सुरवात केली होती. मात्र लावण्या अर्ध्याधिक उरकल्या असतानाच पावसाने दडी मारल्याने लावण्या खोळंबल्या आणि शेतकरी वर्ग चिंतातुर झाला.
गेल्या दहा दिवसांपासून पावसाने कोकणाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे राहिलेल्या लावण्या कशा उरकायच्या हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सकाळी उठल्यावर आकाशाकडे नजर लावून शेतकरी पावसाची वाट पहात आहे मात्र दुर्दैवाने शेतकऱ्याच्या वाट्याला निराशाच येत असल्याने शेताच्या बांधावर बसून पावसाची वाट पाहण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.
येत्या एक दोन दिवसात कोकणात मान्सून पुन्हा सक्रिय होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याच्या या अंदाजामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे मात्र जर येत्या एक दोन दिवसात कोकणात मान्सून सक्रिय झाला नाही तर मात्र शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढणार आहे.
www.konkantoday.com