
आरोग्य वर्धिनी उपकेंद्राच्या माध्यमातून नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध – पालकमंत्री उदय सामंत. रत्नागिरी, दि. 30 (जिमाका) : आरोग्य वर्धिनी उपकेंद्राच्या माध्यमातून नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
मिरजोळे पडवेवाडी (कुवारबाव) येथे आयुष्यमान आरोग्य मंदिर – आरोग्य परम धनम अंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचे उद्घाटन पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते आज संपन्न झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, सरपंच रत्नदिप पाटील, माजी सरंपच राजेश तोडणकर, माजी नगरसेवक सुहेल मुकादम यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच मिरजोळे, कुवारबाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, 15 व्या वित्त आयोगामधून ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये चांगली आरोग्य सुविधा मिळावी, हे शासनाचे धोरण आहे. 8 दिवसापूर्वी अशा प्रकारच्या एका दवाखान्याचे मिरकरवाडा येथे उद्घाटन झाले. आरोग्याची सुविधा घरापर्यंत पोहचली पाहिजे, सुविधा पोहचत असताना कोणत्याही व्यक्तीला त्रास होऊ नये, ही सरकारची भूमिका आहे. या दवाखान्याचा कमीत कमी वापर व्हायला हवा. परंतु, आरोग्याच्या आवश्यक सुविधा येथे उपलब्ध असणे गरजेचं आहे. या आरोग्य वर्धिनी उपकेंद्राच्या माध्यमातून नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.