
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथील हिरण्यकेशी नदी मंदिर परिसरात सापडली वरदिया आंबोलीएन्सीस’
पश्चिम घाटात जगाला आजवर माहीत नसलेल्या गोगलगायीच्या एका प्रजातीचा शोध लागला आहे! सांगलीतील भूमिपुत्राच्या या संशोधनाची दखल ‘जर्नल ऑफ टेक्सॉनॉमी’ या जीवसृष्टीच्या वर्गीकरणाला वाहिलेल्या युरोपातील जगप्रसिद्ध विज्ञानविषयक प्रकाशनाने घेतली आहे. मऊ मुलायम शरीर आणि त्यावर टणक कवच धारण करणार्या जमिनीवरील मृदुकाय/उदरपाद प्राण्यांच्या जागतिक यादीत आता पश्चिम घाटातील या गोगलगायीलाही मानाचे स्थान मिळाले आहे.
सांगलीचे प्रा. डॉ. अमृत भोसले (सध्या कराड येथील गाडगे महाराज कॉलेजमध्ये प्राणिशास्त्राचे सहायक प्राध्यापक) यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथील हिरण्यकेशी नदी मंदिर परिसरात गोगलगायीच्या या नव्या प्रजातीचा शोध लावलाप्राणिशास्त्रासाठी आजवर अज्ञात असलेल्या गोगलगायीच्या या प्रजातीला ‘वरदिया आंबोलीएन्सीस’ असे नाव डॉ. भोसलेंनी दिले. डॉ. भोसले यांनी हे संशोधन कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातील पीएच.डी.दरम्यान केले. याच विद्यापीठाचे माजी विद्यार्थी तसेच सरिसृप वर्गातील 4 पोटजाती व तब्बल आतापर्यंत 56 प्रजाती शोधून काढणारे डॉ. वरद गिरी यांना डॉ. भोसले यांनी आपले हे संशोधन वाहिलेले आहे. डॉ. वरद गिरी यांच्या नावावरूनच गोगलगायीच्या या नव्या प्रजातीचे नामकरण ‘वरदिया आंबोलीएन्सीस’ असे करण्यात आले
www.konkantoday.com
