
इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंदल्या गेलेल्या कसबे डिग्रज येथील एक टन वजनाचा गजा बैल गेला
अनेक वेळेला पाळीव प्राण्यांवर घरच्या पेक्षाही जास्त प्रेम करणारे अवलिया असतात इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंदल्या गेलेल्या कसबे डिग्रज येथील एक टन वजनाच्या गजा बैलाचे हृदयविकाराने नुकतेच निधन झाले. विविध कृषी प्रदर्शनामध्ये गेली दहा वर्षे तो दिमाखात वावरत होता. केवळ त्याला पाहण्यासाठी शेतकरी पैसे मोजत होते. या पैशातून गजाच्या मालकांने कर्जही फेडले.
कसबे डिग्रज येथील कृष्णा साईमते यांनी गजा बैल सांभाळला होता. पिळदार अंगयष्टीमुळे आणि त्याच्या वजनदारपणामुळे पाहण्यासाठी लोकांची रिघ लागत असे. त्याला काजू, बदाम आणि खपली गहू यांचा खुराक देण्यात येत होता. तसेच त्याला उन्हाची तीव्रता भासू नये यासाठी गोठ्यामध्ये पंख्याचीही व्यवस्था करण्यात आली होती.सहा महिन्यांचा असल्यापासून तो विविध कृषी प्रदर्शनामध्ये हजेरी लावत होता. त्याला पाहण्यासाठी तिकीटही काढावे लागत होते. १० वर्षे सहा महिने वयाच्या गजा बैल गेले काही दिवस आजारी होता. गोठ्यातच त्याला औषधपाणी करण्यात येत होते. मात्र उपचार सुरू असतानाच नुकतेच त्याचे हृदयविकाराने निधन झाले. गजा जग सोडून गेल्याचा साईमते कुटुंबाला मोठा धक्का बसलाय.
करोनामुळे मागील दीड दोन वर्षांत लॉकडाउन आणि वेगवेगळ्या निर्बंधामुळे ना कुठे मोठी कृषी प्रदर्शन भरली ना कुठे गजाला आपला डंका वाजवण्याची संधी मिळाली. त्यामुळे गजाच्या माध्यमातून होणारी कमाई देखील या अलीकडच्या काही काळात बंद होती. तरी देखील गजाची देखभाल, त्याच्या खाण्या-पिण्यात त्याच्या मालकाने तसुभरही कमी ठेवली नव्हती. काही वर्षांपूर्वी एका पीक अप गाडी साठी कृष्णा यांनी कर्ज घेतले होते. ते कर्ज देखील गजाला ठिकठिकाणी प्रदर्शनात नेऊन मिळणाऱ्या पैशातून फेडले होते. काही दिवसांपूर्वीच गजा बैलाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली होती. पण त्याचा आनंद साजरा करण्याची संधी काही गजा आणि त्याच्या मालकाला मिळाली नाही.
www.konkantoday.coma
