भरणे येथे साडेतीन लाखांचा गुटखा जप्त; खेड पोलिसांची कारवाई
खेड : खेड पोलिसांनी भरणे नाका येथे ताब्यात घेतलेल्या एका संशयित तवेरा गाडीतून तब्बल साडेतीन लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी खेड पोलिसांनी दापोली तालुक्यातील हणे येथील एकाला अटक केली आहे.
खेड पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुजीत गडदे यांना एका गुप्त बातमीदाराकडून आरएमडी गुटख्याची वाहतुक होत असल्याबाबत माहिती मिळाली होती. या नुसार सुजीत गडदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भरणे नाका येथे पाळत ठेवली होती.
दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास आलेली तवेरा गाडी क्रमांक एम एच ०८ आर ८२९५ ही तपासणीसाठी थांबवली असता या गाडीत पोलिसांना आरएमडी आणि विमल गुटखा असल्याचे आढळून आले. खेड पोलिसांनी या प्रकरणी रज्जाक मेमन रा. हर्णे, दापोली याला ताब्यात घेतले आहे. हा गुटखा मेमन हा दापोली हर्णे येथे विक्री करण्यासाठी घेऊन चालला होता असे तपासात निष्पण्ण झाले.
खेड पोलीस स्थानकाच्या पोलीस निरिक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक सुजीत गडदे, पोलीस कर्मचारी विरेंद्र आंबेडे, साजिद नदाफ, अजय कडू, संकेत गुरव यांच्या पथकाने ही कारवाई केली.
www.konkantoday.com