
बार कौन्सिलतर्फे वकिलांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नपारिजात पांडे; ज्युडिशिअल सर्विस उपक्रमात भाग घेण्याचे आवाहन
रत्नागिरी, ता. ३० : महाराष्ट्रातल्या सर्व, विशेषतः तालुका स्तरावर वकिल बंधू-भगिनींची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहे. इमारत, वकिलांसाठी सोयीसुविधा, महिला भगिनींच्या बैठक व्यवस्था, अन्य सोयीसंदर्भात माहिती घेऊन त्यात मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. बार कौन्सिलतर्फे वकिलांसाठी विमा व वेल्फेअरच्या योजना पोहोचवत आहे. ज्युडिशिअल सर्विस अॅज ए करिअर या उपक्रमात नवोदितांनी भाग घेऊन न्यायव्यवस्थेत योगदान द्यावे, असे आवाहन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोव्याचे अध्यक्ष पारिजात पांडे यांनी केले.
आज रत्नागिरी जिल्हा न्यायालयाच्या सेवासदनमध्ये झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, बार कौन्सिलमार्फत वर्कशॉप, सेमिनार सुरू आहेत, त्यात मोठ्या प्रमाणात सहभाग व्हावे व प्रशिक्षित व्हावे. रत्नागिरीत वकिलांचा उत्साहजनक प्रतिसाद लाभला आहे. वकिलांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू. राहुरी येथील न्यायालयात वकिली व्यवसाय करणाऱ्या सौ. व श्री. आढाव दांपत्याच्या हत्त्येबाबत कौन्सिलने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. समाजाप्रती सेवाभावी दायित्व नजरेसमोर ठेवून व्यवसाय करणाऱ्या अधिवक्ता बंधू-भगिनिंच्या सुरक्षिततेचे दृष्टीने अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट लागू करण्यात यावा यासाठी बार कौन्सिलचे प्रयत्न सुरू आहेत.
याप्रसंगी व्यासपीठावर बार कौन्सिलचे सदस्य संग्राम देसाई, अधिवक्ता परिषद कोकण प्रांत रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड. अविनाश तथा भाऊ शेट्ये, रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. दिलीप धारिया उपस्थित होते. त्यांनी पांडे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. या वेळी संग्राम देसाई यांनी सांगितले की, श्री. पांडे नोव्हेंबरमध्ये अध्यक्ष झाल्यापासून ते महाराष्ट्राच्या दुर्गम भागामध्ये जाऊन वकिल मंडळींना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. परंतु श्री. पांडे अध्यक्ष झाल्यामुळे शासन, प्रशासन व बार कौन्सिलमध्ये समन्वयाचा दुवा बनले आहेत.
चौकट १
१०८ तालुका असोसिएशनला भेट
अॅड. भाऊ शेट्ये म्हणाले की, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष यापूर्वी फक्त निवडणूक प्रचारासाठी येत असत. वकीलांना भेटणे, संवाद साधणे यासाठी यापूर्वी एकही अध्यक्ष फिरताना दिसत नाहीत. परंतु पारिजात पांडे यांनी दोन महिने आणि १२ दिवसांत आजपर्यंत ३०९ पैकी १०८ तालुका बार असोसिएशनला भेट दिली आहे आणि तेथील वकील वर्गाच्या समस्या जाणून घेतल्या आहेत.
www.konkantoday.com