सुकीवली बौद्धवाडी येथे गांजा विक्रीसाठी आलेला पोलिसांच्या ताब्यात
खेड : खेड तालुक्यातील सुकीवली येथे एका घरावर धाड टाकून खेड पोलिसांनी गांजा हा नशेला पदार्थ जप्त केला. महिनाभरात खेड पोलिसांनी केलेली ही दुसरी मोठी गांजाविरोधातील कारवाई आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे तरूण पिढीला बरबाद करण्याचा गांजा, चरस, यारख्या नशेल्या पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
खेड पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजीत गडदे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांकडून सुकीवली बौद्धवाडी येथे एकजण गांजा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गडदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सुकीवली जाधववाडी येथे अचानक धाड टाकून गांजा विकण्याच्या उद्देशाने आलेला आकाश विजय जाधव (३०) याला २२ हजार ५०० रुपये किमतीच्या गांजासह ताब्यात घेतले.
पोलीस कारवाईची चाहूल लागताच आकाश याचा साथीदार अनिल शिवराम चव्हाण उर्फ अनील बुवा (५०) जंगलात पळून गेला. पोलिसांनी अनिल याची दुचाकी मात्र ताब्यात घेतली आहे.
काही दिवसापुर्वी खेड पोलिसांनी महामार्गावरील लवेल नजीक गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एकाची गठडी वळली होती. त्याच्याकडूनही हजारो रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला होता. महिनाभरात पोलिसांनी गांजा विकणाऱ्या आणखी दोघांना अटक केल्याने गांजासारख्या नशेली पदार्थांची विक्री करुन तरूण पिढीला बर्बादीकडे नेणाऱ्या चांगलेच धाबे दणाणले आहेत.