मनमानी कारभार कराल तर – जि प अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी दिला अधिकार्याना इशारा
मनमानी कारभार केलात, जि.प.सदस्यांना विकासकामे करताना विश्वासात घेतले नाही, शिस्तीचे पालन केले नाही तर त्या अधिकार्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा जि. प. अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी सर्वसाधारण सभेत दिला आहे. त्याचबरोबर या बैठकीत एका शाखा अभियंत्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत.
दापोली तालुक्यातील शाखा अभियंता खाचे हे मनमानी कारभार करतात. तसेच लोकप्रतिनिधींचा अपमान करतात, असा आरोप माजी समाजकल्याण सभापती चारूता कामतेकर यांनी केला. या शाखा अभियंत्यावर अनेक तक्रारी असल्याचे या सभेत पुढे आल्या. शेवटी या अभियंत्यावर कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून प्रथम त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी सांगितले. संगमेश्वर तालुक्यातील शाखा अभियंता घुगे हेसुद्धा मनमानी कारभार करीत असल्याचा मुद्दा संतोष थेराडे व संगमेश्वर सभापती जया माने यांनी उपस्थित केला. या अधिकार्याला समज देण्याचा आदेश देण्यात आला. त्याचबरोबर जि.प.मधील प्रत्येक अधिकार्यांनी जि.प. सदस्याशी सौजन्यपूर्ण वागावे. तसेच मनमानी कारभार केला तर त्या संबंधित अधिकार्यावर शिस्तभंगाची किंवा अन्य कारवाई केली जाईल, असा इशाराही यावेळी विक्रांत जाधव यांनी सभागृहात दिला.
खेड तालुक्यातील अस्तान ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत अण्णा कदम व अरविंद चव्हाण आक्रमक झाले होते. दोषी असलेल्या सरपंच, ग्रामसेवक तसेच विकस्तार अधिकारी यांच्यावर पोलिस स्थानकात लवकरात लवकर गुन्हा दाखल करावा, अन्यथा ग्रामस्थांना उपोषणाला बसावे लागेल, असे यावेळी सांगितले.
www.konkantoday.com