खेड तालुक्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधित बालकांच्या पार्श्वभुमीवर रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची खेडला भेट
खेड : खेड तालुक्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधित बालकांच्या पार्श्वभुमीवर रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी खेड येथे भेट देवून कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. या दरम्यान त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांसह ग्रामकृती
दलाच्या सदस्यांशी संवाद साधत आरोग्य विभाला कोरोना चाचण्या वाढविण्याच्या सुचना केल्या. राज्यात कधीही तिसरी लाट येऊ शकते त्यामुळे प्रत्येकाने कोरोनाला रोखण्यासंदर्भात शासनाने केलेल्या सुचनांचे पालन करावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
गेल्या आठवड्यात तालुक्यातील सुसेरी नंबर १ येथील एकाच घरातील चार बालकांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. सुरवातीला त्यांचे आई-वडील कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यानंतर त्या घरातील १४ ते २ या वयोगटातील चार मुलांची कोरोना चाचणी केली असता ती चारही बालके कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले होते. खेड तालुक्यातील सुसेरी नंबर १ येथील या घटनेने जिल्हा आरोग्य यंत्रणा हादरून गेली होती. १४ ते २ या वयोगटातील तब्बल ४ बालके कोरोनाबाधित आढळून आल्याने जिल्हा तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर तर उभा नाही ना अशी भिती व्यक्त केली जात होती.
या चारही बालकांना खबरदारीचा उपाय म्हणून येथील शिवतेज कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्या चारही बालकांना फारसा त्रास जाणवत नसला तरी त्यांना असलेला धोका टळला आहे हे म्हणता येत नाही. या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी खेड तालुक्यातील कोरेगाव येथे भेट देवून कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. माझे गाव माझी जबाबदारी या योजनेतंर्गत खेड तालुक्यातील कोरेगाव ग्रामपंचायतीला आपण भेट दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कोरोना रोखण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न समाधानकारक असल्याचे मत त्यांनी यावेळी कले. कोरोना चाचण्या थोड्या उशीराने होत आहेत त्या वाढविणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले.