मनाचा निर्धार, लढण्याची हिंम्मत व ठाम आत्मविश्वासच्या जाेरावर डॉ नीलेश शिंदे व डॉक्टर तोरल शिंदे या दाम्पंत्याने जिंकला कराेना विरूध्दचा लढा
जो पर्यंत एखादे संकट आपल्यापर्यंत येत नाही तोपर्यंत दुसर्यांना दिले जाणारे सहानुभूतीचे, काळजीचे शब्द तसेही कोरडेच असतात पण आपणच एखाद्या वादळाचे भाग होतो तेव्हा मात्र प्रत्यक्षत त्याची तीव्रता अचानक जाणवते आणि मग तो धक्का जबरदस्त असतो.
कोरोनाच्या बाबतीतही तसेच झाले. डॉक्टर म्हणून काम करताना आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला दिलासा देण्याची, त्याच्याशी पॉझिटिव्ह बोलायची मोठी जबाबदारीच आमच्यावर असते, कोरोना काळ सुरू झाल्यापासून आम्हीही तेच करत होतो, येणाऱ्या प्रत्येकाना एक पॉझिटिव्ह सपोर्ट देण्याचं काम करत होतो. पण कोरोनाचे हे संकट कधी ना कधी आम्हाला येऊन धडकणार हेही आम्ही जाणून होतोच. त्यामुळे संपूर्ण काळजी घेऊन, नियमित व्यायाम करून, लसीकरण, कोरोनाचे सर्व नियम पळूनही अखेरीस २८ मे २०२१ ला ते संकट दबक्या पावलाने का होईना आले. पण आम्ही केलेले लसीकरण, व्यायाम, घेतलेली योग्य काळजी यामुळे यातून आम्ही वेळेवर सही सलामत बाहेरही पडलो हेही तितकेच खरे !
कोरोनाने आमच्या कुटुंबात पहिला हल्ला केला तो माझे पती आणि बालरोग तज्ञ डॉ निलेश शिंदे यांच्यावर! त्यामुळे संपूर्ण कुटुंब अलर्ट झाले. आम्ही लगेच स्वतःला विलग केले. मी माझीही चाचणी केली, त्यात दोन दिवसांनी केलेल्या RTPCR चाचणीत अपेक्षेप्रमाणे मी सुद्धा पॉझिटिव्ह आले.
जे संकट समोरून आले होते ते कसा अटॅक करणार या वैद्यकीय क्षेत्रात काम करताना आम्हला माहीत होते आणि आमची तयारीही झाली होती. पण कितीही झालं तरी संकट हे संकटच असतं, ते आपली परीक्षा बघत असतंच. आम्ही स्वतःला आयसोलेट करून घेतलं, संपर्क बंद केला, जी आवश्यक औषधे होती ती सुरू केली, यात सर्वात महत्वाचे म्हणजे आम्ही सुरुवातीपासूनच स्टीरिओएड्स मात्र घेणे टाळले. ही औषधे हा कोरोना वरचा शेवटचा वार असतो. त्यामुळे आवश्यक औषधे, 6 मिनिटं वॉक, ब्लड टेस्ट पासून सगळ्या गोष्टी करून काळजी घेतली. त्यामुळे पहिल्या ५दिवसांपर्यंत काहीच त्रास नव्हता. मात्र परिस्थिती सहाव्या दिवसापासून बदलू लागली.
डॉ. निलेश यांना ताप आला. अपेक्षेप्रमाणे कोरोनामध्ये ७ व्या दिवसानंतरच त्रास होती हेही माहीत होतेच, पण डॉक्टरांची तब्येत थोडी गंभीर होत होती. अशावेळी आपल्या हातात एक आश्वासक, ‘सगळं ठीक होईल’ हे सांगणारा हात हवा असतो, आम्ही दोघांमधील विश्वासाचे बंध अधिक घट्ट होते, त्याच विश्वासाने याचाही सामना तितक्याच निकराने करायचे आम्ही ठरवले.
परिस्थिती परीक्षा बघतेच. डॉ. निलेश याना ताप वाढू लागला, परिस्थिती बिघडत असताना त्यावेळी रत्नागिरीतील हॉस्पिटलमध्ये एकही बेड शिल्लक नव्हताच आणि आमचे हॉस्पिटल असूनही अन्य नॉन कोव्हीड रुग्णांचे आयुष्य धोक्यात घालून आम्हाला तिथे ऍडमिट व्हायचे नव्हते.
त्यामुळे अखेरीस आम्ही मुंबईत जाण्याचा निर्णय घेतला. दोघेही पॉझिटिव्ह, पण सोबत कुणालाही न घेता आणि जाताना आम्ही पूर्ण बरे होऊनच येणार हा विश्वास देऊन आम्ही मुंबईला निघालो. हा निर्णय तस म्हटलं तर फार सोपा नव्हता. आमची मुले, आई, सगळे नातेवाईक, अगदी घराप्रमाणेच असलेला आमचा हॉस्पिटलमधला आमचा स्टाफ प्रत्येकाच्या चेहऱ्यावरची काळजी आणि कोरोना या नावाने आलेला ताण स्पष्ट दिसत होता. आजारी आम्ही असलो तरीही आम्हालाच या सगळ्यांना सांभाळायचे होते, त्यांच्या मनातील भीती घालवयची होती. पण अशावेळीच परमेश्वर कुठून आत्मविश्वास देतो माहिती नाही, पुढे काय होणार हे माहीत नसतानाही या सगळ्यांना मी मात्र ‘आम्ही ठणठणीत बरे होऊन येऊ’ असा शब्द दिला आणि मुंबईला जाण्यासाठी बाहेर पडलो.
रत्नागिरी ते मुंबई हा प्रवास तसा काही तासांचा पण ज्या परिस्थितीत आम्ही निघालो होतो ते पाहता प्रत्येक टप्पा ताणाचा होता. अशावेळी मदत झाली ती आमच्या मित्र मंडळींची ! डॉ. पराग पाथरे, डॉ. अमित म्हात्रे, डॉ. किर्तीकुमार पिलणकर, डॉ. विजय सुर्यगंध, डॉ. निलेश नाफडे, डॉ. जितेंद्र घावणे, डॉ. शिरीष फेगडे, हेमंत जोशी या सगळ्यांनीच आम्हाला खूप सहकार्य केलं, धीर दिला आणि आमचा प्रवास सुरु झाला.
अर्थात ही लढाई प्रत्यक्षात आम्हाला लढायची होती. पण पाठीशी आमच्या धनवंतरी स्टाफ सह या सगळ्यांच्या सदिच्छा होत्याच पण
जे होईल त्याचा दोघानी सामना करायचा, होईल ते सगळं चांगलंच होणार आहे हा विश्वास आणि परमेश्वरावरची अढळ निष्ठ आमच्या सोबत होती. मुंबई ला गेल्यावर परिस्थिती नियंत्रात येऊ लागली. फोरटिस च्या डॉक्टर नी आवश्यक उपचाराला सुरुवात केली. यातही चेस्ट फिजोथेरिपी आणि स्पिरोमेट्री या दोन गोष्टी कोरोना उपचारामध्ये महत्वाच्या असतात. त्यातच ‘प्रोन पोझिशन’ मध्ये म्हणजे पालथे झोपणे सुद्धा श्वासावर नियंत्रण ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावत असते. या काळात आम्ही कमी बोलत होतो. त्याचाही फायदा झालाच. यामुळे या संकटातून बाहेर पडण्यास आम्हाला उपयोग झला.
त्यानंतर अनेकांनी काळजी व्यक्त केली, शुभेच्छा दिल्या पण त्यात अनेकांचा एक प्रश्न कॉमन होता, इतकं परफेक्ट आयुष्य जागून कोरोनाने तुम्हाला गाठलेच कसे, यावर मला वाटत की या साथीच्या काळात कोरोना कुणालाही होऊ शकतो पण आम्ही घेतलेली काळजी, लसीकरण, सायकलिंग, व्यायाम, योग्य आहार आणि पॉझिटिव्ह थिंकिंग यामुळे यातून बाहेर पडणे आमच्यासाठी जास्त सोपे झाले.
आज रत्नागिरी रेड झोन मध्ये आहे. अनेक दिवस अनेक निर्बंध आपल्यावर लागू आहेत. एकीकडे जीवघेणा आजार आणि दुसरीकडे आर्थिक अडचण अशा दुहेरी संकटात आपण आहोत, पण तुम्हाला सगळ्यांना या निमित्ताने सांगावेसे वाटते की घाबरू नका, यातूनही बाहेर पडणे शक्य आहे. यासाठीच कोरोनाचे साधे सोपे नियम पाळले जाणे आवश्यक आहे. आजही जरा सूट मिळाली की बाजारात मोठी गर्दी होते, आपण कोरोना आपल्या आजूबाजूला असल्याचेही विसरून जातो. हे दुर्लक्षच आपल्याला घातक आहे. म्हणूनच योग्य काळजी, नियमाचे पालन, लसीकरण आणि वेळेवर तपासणी हेच यावरचे खरे उपचार आहेत.
डॉ.तोरल शिंदे
स्त्री रोग तज्ञ, रत्नागिरी