रत्नागिरीची सुकन्या दिग्दर्शिका रेणू सावंत ; दोनवेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर मोहोर, भारतातील १० प्रतिभावंतांमध्ये स्थान
रत्नागिरी– रत्नागिरीतील मिऱ्या गावची सुकन्या चित्रपट-दिग्दर्शिका रेणू सावंत यांनी मिऱ्या येथे राहून चित्रपट व माहितीपट चित्रित करून दोनवेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर मोहोर उमटवली आहे. पुन्हा एकदा ती आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आली आहे. ब्रिटिश अॅकॅडमी ऑफ फिल्म अॅण्ड आर्टस् बाफ्ताने यावर्षी निवडलेल्या भारतीय दहा प्रतिभावंतांमध्ये तिने स्थान मिळवून आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
येथील रेणू सावंत यांनी मिऱ्या येथे चित्रित केलेला ‘द इब्ब टाईड’ हा माहितीपट बाफ्ताच्या स्पर्धात्मक उपक्रमासाठी सादर केला होता. बाफ्ताने नेटफ्लिक्सच्या सहयोगाने पहिला बाफ्ता ब्रेकथ्रू इंडिया इनिशिएटिव्ह हा स्पर्धात्मक उपक्रम यावर्षी राबवला. या उपक्रमांतर्गत चित्रपट, क्रीडा व टेलिव्हिजन या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तीकडून अर्ज मागवले होते. रेणू यांनी सादर केलेल्या ‘दी इब्ब टाईड’ या माहितीपटाने नामवंत परीक्षकांची पसंती मिळविली. संगीतकार ए. आर. रेहमान, ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर, मोनिका शेरगिल, मिरा नायर, सिद्धार्थ रॉय कपूर या दिग्गजांचा सहभाग असलेल्या परीक्षक मंडळाने देशभरातील प्रतिभावंतांनी केलेल्या सादरीकरणातून दहा मोहरे निवडले.
येथील मिऱ्या गावाशी नाते असणाऱ्या रेणू सावंत मुंबईत वाढल्या, पुणे-मुंबईत शिकल्या. लेखनाची आवड आणि चित्रपट क्षेत्राबद्दल प्रचंड उत्सुकतेने त्यांनी पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. याच इन्स्टिट्यूटमधून दिग्दर्शन आणि पटकथा लेखन या विषयात पदवी मिळवली. एफटीआयआयमध्ये शिकत असतानाच त्यांना २०११ व २०१४ ला अनुक्रमे विशेष उल्लेखनीय आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. रेणू यांनी ‘एरावत’ आणि ‘अरण्यक’ हे काल्पनिक लघुपट सादर केले होते. या दोन लघुपटासाठी २०११ व २०१५ मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. एफटीआयआयमध्ये असताना त्यांना यशाची दारे खुली झाली. केरळमधील आंतराष्ट्रीय लघुपट, माहितीपट महोत्सवातील विशेष उल्लेखनीय अॅवॉर्ड एफटीआयआयचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी किताब, थर्ड आय एशियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार अशा अनेक पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. २०१९ ला त्यांनी येथील मिऱ्या गावातच ६० मिनिटाचा ‘द इब्ब टाईड’ हा दुसरा माहितीपट चित्रित केला. यासाठी त्यांना नवी दिल्लीतील ट्रस्टची फेलोशिप मिळाली. विशेष म्हणजे हा माहितीपट जर्मनीतील डोक लेपझिंग फिल्म फेस्टिवलसाठी निवडला गेला होता.
भारतीय प्रतिभांना संधी बाफ्ता ब्रेकथ्रू इंडिया इनिशिएटिव्हसाठी आलेल्या सादरीकरणाचा दर्जा अत्युच्च आणि उत्साहर्धक होता. यामुळे आम्हाला आधी ठरल्यानुसार ५ ऐवजी भारतातल्या १० प्रतिभावंतांची निवड करावी लागली. हा ब्रेकथ्रू भारतीय प्रतिभावंतांना जीवनातील अमूल्य संधी देतो, अशी प्रतिक्रिया बाफ्ता ब्रेकथ्रू इंडियाचे अॅम्बेसेडर, परीक्षक मंडळ सदस्य संगीतकार ए. आर. रेहमान यांनी दिली.
बाफ्ताने दखल घेतल्याचा आनंद
मुंबईत पुढील शिक्षण घेताना मिऱ्या या मूळ गावात ‘मेनी मन्थ इन मिऱ्या’ हा माहितीपट चित्रित केला. पश्चिम किनारपट्टीवरील हे गाव आणि तेथील लोकजीवनाचा हा माहितीपट. २०१७ मध्ये माहितीपटाने सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठी अब्राहम नॅशनल अॅवॉर्ड पटकावले होते. पदवी घेतल्यानंतर मिऱ्या गावात पहिला ‘मेनी मन्थ इन मिऱ्या’ आणि त्यानंतर याच ठिकाणी ‘द इब्ब टाईड’ ही फिल्म बनवली. मी माझ्या भूमीत कोकणात करत असलेल्या वेगवेगळ्या चित्रपट निर्मितीची बाफ्ताने दखल घेल्याचा आनंद होत असल्याचे रेणू सावंत यांनी सांगितले.