
राजधानी एक्स्प्रेसचे इंजिन रूळावर आणण्यासाठी एमएफडी तंत्राचा वापर
कोकण रेल्वे मार्गावरील करबुडे बोगद्यात घसरलेल्या राजधानी एक्स्प्रेसचे इंजिन रूळावर आणण्यासाठी रेल्वेच्या तज्ञ अधिकार्यांनी एमएफडी तंत्राचा वापर केला. या अत्याधुनिक यंत्रणांमुळे गाडीतील प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. प्रवासी गाडीतच असताना इंजिन रूळावर आणण्यात तज्ञ अभियंत्यांना यश आले आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठा बोगदा म्हणून करबुडेची नोंद आहे. सुमारे साडेसात कि.मी. च्या या बोगद्यात लाजुळच्या बाजूने एक कि.मी. अंतरावर आतमध्ये राजधानी एक्स्प्रेसचे इंजिन घसरले. सर्वाधिक डबे बोगद्यात होते. पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. प्रवाशांच्या मनामध्ये भीतीचे वातावरणही होते. काही प्रवाशांना गाडी दुर्घटनाग्रस्त असल्याची माहिती नव्हती. अत्याधुनिक तंत्राचा रेल्वेतील वापर हाच त्याला एकप्रकारे कारणीभूत आहे.
अरूंद बोगद्यात जागा अपुरी असतानाही रेल्वेच्या तज्ञ अधिकारी, कर्मचार्यांनी दुरूस्तीला सुरूवात केली. इंजिन रूळावर आणण्यासाठी एमएफडी तंत्राचा वापर केला. यामध्ये इलेक्ट्रीक जॅकच्या सहाय्याने इंजिन हळुहळू वर उचलले जाते. त्याचा वेग अत्यंत हळुवार असावा लागतो. यामध्ये इंजिनचा पार्ट तुटण्याची शक्यता असते. जॅक लावून इक्सलला जोडलेली चाके वर उचलण्यात आली. चाके स्लायडींग करुन हळुहळू रूळावर ठेवण्यात आली. जॅक हा हवेच्या दाबावर चालत असतो. इंजिन रूळावर आणल्यानंतर पाचव्या बोगीजवळ अडकलेला भलामोठा दगड फोडण्याचे आव्हान होते. इंजिन रूळावर घेत असताना काही कर्मचारी दगड फोडत होते. त्यासाठी ड्रीलमशीनचा वापर करण्यात आला. तो दगड बोगीला अडकून पडलेला होता. यामध्ये ब्रेकर मशिनचाही वापर करण्यात आला. दोन्ही गोष्टींसाठी सुमारे तीन तासाचा काळ लोटला. त्यानंतर अत्यंत कमी वेगाने ती गाडी हळुहळू बोगद्याच्या बाहेर आणली गेली. तुटलेले रूळही बदलण्यात आले.
www.konkantoday.com