
दाभिळ नाक्यानजीक रस्त्याचा भराव खचून एक कंटेनर रुतला
खेड : पहिल्याच पावसात खेड तालुक्यातील दाभिळनाक्यानजीक रस्त्याचा भराव खचून एक कंटेनर रुतला. महामार्ग चौपदरीकरण कामाच्या ठेकेदार कंपनीने या ठिकाणी तातडीने यंत्रणा कामाला लावून वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला असला तरी पावसाळ्यात महामार्गावरील अनेक ठिकाणे वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चारपदरी रस्ता तयार करण्याचे काम गेली अनेक वर्षे सुरू आहे. मात्र, गेल्या काही वर्षात या कामाला गती मिळाली असून, मोठ्या प्रमाणात महामार्गावर डोंगर फोडणे, मातीचा भराव व पुलांची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात महामार्गावर वाहने चालवताना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. महामार्गावर ज्या ठिकाणी चौपदरी रस्त्याचे बांधकाम रखडले आहे, तेथे विनाअपघात वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदार कंपनीची आहे.
शुक्रवारी पहिला पाऊस पडल्यानंतर खेड तालुक्यातील कशेडी ते परशुराम घाट भागात अनेक ठिकाणी पर्यायी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. दाभिळनाक्यानजीक मातीचा भरावाचा रस्ता खचू लागल्याने यावरून सुरू असलेली वाहतूक धोकादायक बनली आहे. शनिवारी या भागात सकाळीच रस्त्याच्या बाजूला भराव खचून एक कंटेनर उलटून रुतला. मात्र, वेळीच क्रेनच्या सहाय्याने त्याला बाहेर काढण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.