
निवडणूक आयोगाविरोधात आज ‘मनसे’सह ‘मविआ’चा मुंबईत निघणार ‘सत्याचा मोर्चा’
नवनिर्माण सेना आणि महाविकास आघाडी केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगाविरोधात आज(१ नोव्हेंबर) मुंबईत भव्य मोर्चा काढणार आहे. या मोर्चाला ‘सत्याचा मोर्चा’ असे नाव दिले गेले आहे.या मोर्चात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वत: मोर्चेकरींसोबत पायी चालणार आहेत. हा मोर्चा दणदणीत करणार असल्याचा निर्धार राज ठाकरेंनी या आधीच बोलून दाखवलेला आहे.तर दुसरीकडे या मोर्चात महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार, काँग्रेस, समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्षासह डावे आदी सर्वच पक्षांचा सहभाग असणार आहे.
तर प्राप्त माहितीनुसार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काही काँग्रेसच्या बड्या नेत्यांची या मोर्चाला अनुपस्थिती राहू शकते. मोर्चा दुपारी एक वाजता मुंबईमधील फॅशन स्ट्रिट येथून सुरू होणार आहे आणि मेट्रो सिनेमामार्गे मुंबई महानगर पालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ तो जाणार आहे.




