मत्स्य महाविद्यालयामध्ये प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना जनजागृती आभासी चर्चासत्र संपन्न

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोलीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय मत्स्यकी विकास मंडळ (NFDB) व मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत निमखारे पाण्यातील कोळंबी संवर्धन विकास योजना या विषयावर आभासी (Online) चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. दि. ११ जून २०२१ रोजी पार पडलेल्या या चर्चासत्राचा लाभ महाराष्ट्रातील १८४ मत्स्य व कोळंबी संवर्धकांनी  Zoom आणि YouTube च्या माध्यमातून विनामूल्य घेतला. या चर्चासत्राला डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय सावंत व विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

“कोव्हीड १९ च्या पार्श्र्वभूमीवर आभासी माध्यमाव्दारे पार पडणारं हे चर्चासत्र महाराष्ट्रातील कोळंबी व मत्स्य संवर्धकांना मार्गदर्शक ठरणारं असून यामुळे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा लाभ अधिकाधिक व्यावसायिकांपर्यंत पोहचेल” असा आशावाद कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी याप्रसंगी व्यक्त केला. तसेच या चर्चासत्रा नंतर सामाजिक माध्यमाव्दारे (What’s app group) मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी सहभागी झालेल्या इच्छुक मत्स्य व कोळंबी संवर्धकांच्या संपर्कात राहून प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी माहिती देणार असल्याचे त्यांनी नमूद केले. चर्चासत्रानंतर सुध्दा संवर्धकांच्या सतत संपर्कात राहण्याच्या चर्चासत्र समन्वयकांच्या या अभिनव उपक्रमाचं त्यांनी कौतुक केले आणि विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या या चर्चासत्राला कुलगुरू महोदयांनी शुभेच्छा दिल्या.

विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे यांनी चर्चासत्राला उपस्थित संवर्धकांना मार्गदर्शन केले. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना हि सन २०२०-२१ पासून संपूर्ण देशभर राबवली जात असताना पहिल्या वर्षी या योजनेला अल्प प्रतिसाद मिळाला. पण या योजनेच्या जनजागृती करीता आयोजित केलेल्या या चर्चासत्रामुळे व त्यात योजनेच्या अंमलबजावणीसाठी दिलेल्या साध्या-सोप्या भाषेतील माहिती मुळे भविष्यात अनेक मत्स्य व कोळंबी संवर्धक या योजनेचा लाभ घेऊन व्यवसायात आपलं स्थान निर्माण करतील व त्याकरीता विद्यापीठ माध्यम म्हणून कार्यरत झाल्याचं अशा कार्यक्रमातून प्रतित होत असल्याचं विशेषत्वाने नमूद केले.

या चर्चासत्र आयोजनाची पार्श्र्वभूमी मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिनगारे यांनी प्रास्ताविकातून दिली. यावेळी त्यांनी या आभासी चर्चासत्राला आर्थिक सहाय्य दिलेल्या राष्ट्रीय मत्स्यकी विकास मंडळ (NFDB), हैदराबाद यांचे आभार मानले व आयोजनाला परवानगी देऊन पूर्णवेळ उपस्थित राहिल्याबद्दल कुलगुरू डॉ. संजय सावंत व विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे यांना धन्यवाद दिले.

तांत्रिक सत्राच्या सुरुवातीला प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची माहिती ध्वनीचित्र फितीच्या माध्यमातून सहयोगी प्राध्यापक डॉ. सुहास वासावे यांनी प्रभावीपणे सादर केली. मत्स्यव्यवसाय विभाग (महाराष्ट्र शासन) चे प्रादेशिक उपायुक्त श्री. महेश देवरे यांनी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतील निमखारे पाण्यातील मत्स्य व कोळंबी संवर्धन विकास योजनेविषयी इत्यंभूत माहिती आपल्या सादरीकरणातून दिली. प्रभारी विस्तार शिक्षण विभाग प्रमुख डॉ. केतन चौधरी यांनी योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक असलेला विस्तृत प्रकल्प अहवाल कसा असावा, याबाबत अतिशय सुरेख पध्दतीने सखोल मार्गदर्शन केले. शेवटी सहाय्यक प्राध्यापक श्री. भालचंद्र नाईक यांनी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती व त्यांची पूर्तता कशी करावी याचे विश्लेषण केले.

चर्चासत्रात रत्नागिरी चे सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त श्री. नागुनाथ भादुले यांनी संवर्धकांच्या शंकांचे निरसन केले.

चर्चासत्राचे सूत्रसंचालन मत्स्य विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख आणि चर्चा सत्र समन्वयक डॉ. केतन चौधरी यांनी तर तंत्र निर्देशन सहयोगी प्राध्यापक डॉ. सुहास वासावे यांनी केले. चर्चासत्राच्या आयोजनासाठी सहयोगी प्राध्यापक डॉ. भरत यादव, डॉ. संदेश पाटील व आचार्य स्नातक श्री. वैभव येवले यांनी विशेष परिश्रम घेतले.

या चर्चासत्रात मत्स्यव्यवसाय विभाग (महाराष्ट्र शासन) चे अधिकारी, सागरी जीव शास्त्रीय संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ, कोकण किनारपट्टीवरील निमखारे कोळंबी संवर्धक, कोळंबी संवर्धन क्षेत्रात कार्यरत विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, तसेच नवीन व्यावसायिक सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button