
जिल्ह्यात कांदळवन दिन साजरा
रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय स्तरावर 26 जुलै रोजी साजरा होणार्या कांदळवन दिनानिमित्ताने कांदळवन कक्षाच्यावतीने जिल्हाभरात कांदळवन संरक्षणाबाबत जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवण्यात आले.
कांदळवनजागृतीसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांना कांदळवन म्हणजे काय? पर्यावरणातील त्यांचे महत्व, कांदळवनातील जैवविविधता, रत्नागिरी जिल्ह्यात आढळणार्या काही मुख्य प्रजाती, त्यांच्या संरक्षणाचे महत्व समजावून सांगण्यात आले. भावी पिढी असणार्या या विद्यार्थ्यांना कांदळवन संवर्धनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
यानिमित्ताने सर्वांकष विद्यामंदिर रत्नागिरी, राजापूर धाऊलवल्ली येथील गोखले माध्यमिक विद्यालय, आंजर्ले येथील एम. के. विद्यामंदिर येथे कांदळवनातील जैवविविधता या विषयावर चित्रकला स्पर्धा झाली. या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सोनगाव येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच जिल्ह्यात कांदळवनातील जैवविविधता विषयावर खुली ऑनलाईन मोबाईल फोटोग्राफी स्पर्धाही घेण्यात आली.
जिल्ह्यातील पोदार इंटरनॅशनल स्कूल रत्नागिरी, फणसोप येथील श्री लक्ष्मीकेशव माध्यमिक विद्यालय फणसोप, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय भाळवली, जि. प. शाळा पावस व नाटे येथे कांदळवन संरक्षणाबाबत जागरुकता कार्यक्रम कांदळवन कक्ष रत्नागिरीचे वनक्षेत्रपाल किरण ठाकूर व उपजिविका तज्ज्ञ वैभव बोेंबले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.