
रत्नागिरी तालुक्यातील वरवडे येथील खारलँड बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामाचा फटका ,पावसाचे पाणी ग्रामस्थांच्या थेट घरात शिरले
रत्नागिरी तालुक्यातील वरवडे येथील खारलँड बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या भोंगळ कामाचा फटका येथील ग्रामस्थांना बसला आहे. ठेकेदाराने अर्धवट ठेवलेला बंधारा खारलँडच्या अधिकाऱ्यांनी माती टाकून भरला. मात्र पाणी जाण्यासाठी जागाच न ठेवल्याने शनिवारी रात्री कोसळलेल्या पावसाचे पाणी ग्रामस्थांच्या थेट घरात शिरले. यात घरातील अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू आणि घराचे मोठे नुकसान झाले आहे.तालुक्यातील वरवडे येथे खारलँड बंधाऱ्याचे काम हाती घेण्यात आले होते.मात्र, या बंधाऱ्याचे काम अर्धवट अवस्थेत ठेवून काम घेतलेला ठेकेदार गायब झाला होता. अर्धवट अवस्थेतील कामामुळे यापूर्वी भरतीचे पाणी थेट रहिवाशांच्या भागात शिरले होते. ग्रामस्थांनी या विरोधात आवाज उठवल्यानंतर खारलँडच्या अधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी केली आणि अर्धवट असलेला बंधारा मातीचा भराव टाकून पूर्ण केला. बंधारा पूर्ण करताना पाणी जाण्यासाठी कोणतीच व्यवस्था न केल्याचा आणि खारलँड विभागाच्या भोंगळ कारभाराचा मोठा फटका वरवडे गावातील ग्रामस्थांना बसला आहे.भंडारवाडी येथे रात्री १२नंतर पाणी भरण्यास सुरुवात झाली. पाण्याचा निचरा होण्यास जागा नसल्याने पाणी रहिवासी भागात शिरण्यास सुरुवात झाली. मध्यरात्री २ वाजता पाणी थेट ग्रामस्थांच्या घरात शिरले. अचानक आलेल्या या संकटाने ग्रामस्थ पुरते घाबरले. मध्यरात्री २ वाजता शिरलेले पाणी बाहेर काढण्यासाठी संपूर्ण रात्र येथील ग्रामस्थांनी जागून काढली.काल रात्री २ वाजता जनावरे आणि माणसांना स्थलांतरित करावे लागले.
वरवडे भंडारवाडा येथील शंकर बोरकर आणि अन्य दोघांचे मोठे नुकसान झाले आहे.
www.konkantoday.com