
यंदा समुद्राला पावसाळ्यात १८ दिवस मोठी भरती! २६, २७ जून जुलैला सर्वात मोठी उधाणं!!
अलिबाग :* कोकण किनारपट्टीवर यंदा पावसाळ्यात १८ दिवस समुद्राला मोठी उधाणं (भरती) येणार आहेत. त्यामुळे या काळात साडेचार मीटर हून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. २६,२७ जूनला पावसाळ्यातील सर्वात मोठी भरती कोकणवासियांना अनुभवता येणार आहे. दरवर्षी पावसाळ्यात समुद्राला मोठी उधाण येत असतात. या उधाणांचा किनारपट्टीवरील भागांना बरेचदा तडाखा बसत असतो. त्यामुळे पावसाळ्यापूर्व समुद्राला येणाऱ्या संभाव्य मोठ्या भरतीचे अंदाजपत्रक आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत जाहीर केले जाते. या दिवशी मच्छीमारांना तसेच किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचे आदेश दिले जात असतात.यावर्षी पावसाळ्यात १८ दिवस मोठी उधाण येतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यात जून मधील पाच, जुलै मधील चार, ऑगस्ट मधील पाच, आणि सप्टेंबर मधील चार दिवसांचा समावेश आहे. या दिवशी समुद्राला साडे चार मीटर पेक्षा अधिक मोठी भरती येणे अपेक्षित आहे. २६ जूनला ४.७५ मीटर, २७ जूनला ४.७३ मीटरची भरती कोकण किनारपट्टीवर अनुभवता येणार आहे. या पार्श्वभूमीवर समुद्र, खाडी तसेच नदी किनऱ्यावरील गावांना स्थानिक पातळवीर आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.रायगड जिल्ह्यात नदी, खाडी आणि समुद्र किनाऱ्यावर एकूण ३८५ गावे आहेत.
या गावांना स्थानिक पातळीवर नियोजन करण्याबाबतचे आदेश रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिले आहेत*उधाणाचा परिणाम काय होतो?*या कालावधीत उधाणांचे पाणी किनारपट्टीवरील भागात शिरण्याची शक्यता असते. समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे शेतात खारेपाणी शिरून जमीन नापीक होऊ शकते. सखल भागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. याच कालावधीत अशातच मोठा पाऊस झाल्यास, पाण्याचा निचरा होण्यास अडसर होतो. ज्यामुळे नद्या, नाल्यांना पूर देखील येऊ शकतो. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला समुद्राला येणाऱ्या मोठ्या भरतीची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून जारी केली जाते. नागरिकांना या दिवशी सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले जातात.
मोठी भरती असलेले धोक्याचे दिवस**
जून महिन्यात २४ ते २८* जुलै महिन्यात २४ ते २७* ऑगस्ट महिन्यात १० ते १२ आणि २३,२४* सप्टेंबर महिन्यात ८ ते ११