
कशेडी घाटात कोसळली दरड; एकाच मार्गिकेवरून दुहेरी वाहतूक
पोलादपूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात गुरूवारी सायंकाळी दरड कोसळल्याने एकाच मार्गिकेवरून दुहेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली. रात्री उशिरापर्यंत हा लालमातीच्या दरडीचा ढिगारा एका मार्गिकेवर तसाच पडून राहिला. कशेडी घाटाच्या सुरूवातीला चोळई गावापासूनच एकाबाजूला डोंगर कापून काँक्रीटीकरणाचा रस्ता आहे. गुरूवारी दुपारनंतर चोळई येथे उभा डोंगर कापल्यामुळे दरड कोसळण्याची घटना घडल्यानंतर रस्त्यालगतच्या संरक्षक कठड्यावरून हा ढिगारा काँक्रीटच्या रस्त्यावर आल्याचे दिसून आले. यावेळी ठेकेदार कंपनीने पावसाची रिपरिप सुरू असल्याकारणाने तातडीने दरडीचा ढिगारा हलविण्याचे टाळले. यामुळे चारपदरी राष्ट्रीय महामार्गापैकी दोन पदरी रस्ता या दरडीमुळे बंद झाला.