
राजापुरात चोरट्यांचा धुमाकुळ; सावध राहण्याचे पोलिसांचे आवाहन
राजापूर : तालुक्यात गेल्या काही दिवसांत घडलेल्या दुचाकी चोरीच्या घटना व बंद घरांना चोरट्यांनी केलेले लक्ष्य यामुळे जनतेमध्ये काहीसे असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या प्रकरणांची पोलीस प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेत तपास व चौकशी सुरू आहे; मात्र अनेक वाहन चालक व दुचाकीस्वारांकडून लॉक व हँन्डल लॉकही केले जात नसल्याने चोरीचा धोका अधिक निर्माण होत आहे. तर अनेक भागात सीसीटीव्ही नसल्याने तपासातही अडचणी येत आहेत. यासाठी वाहन चालक, नागरिकांनीही सहकार्य करावे आपली वाहने लॉक करावीत व शक्य असेल तेथे सीसीटीव्ही लावावेत असे आवाहन राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी केली आहे.
राजापूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये बाईक चोरीचे प्रमाण वाढलेले आहे. अनेक भागात वाहन चालक व दुचाकीस्वारांकडून गाडया लॉक व हॅन्डल लॉकही केले जात नाही. तर अनेक मंदिरांमध्ये दान पेटया आहेत, पण मंदिर उघडी ठेवलेली आहेत. तर अनेक बंद घरांमध्येही रोख रक्कम व दस्तऐवज ठेवले जातात.
याबाबत वारंवार आवाहन करूनही गांभीर्याने घेतले जात नाही. अशा प्रकारचे गुन्हे कमी करण्यासाठी जनतेच्याही सहकार्याची आवश्यकता असून त्यासाठी पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन यादव यांनी केले आहे. यामध्ये काही कामानिमित्त घर बंद ठेवणार असेल तर घरामध्ये कोणतेही कॅश सोन्या चांदीचे दागिने वा चांदीच्या मुर्त्या ठेवू नयेत. घर बंद असेल तरी घरातील एखादा लाईट, बाहेरील एखादा लाईट सुरू ठेवावा.
घराशेजारील ओळखीच्या व्यक्तींना सकाळी व संध्याकाळी बंद घराकडे फेरी मारून लक्ष ठेवण्यासाठी सांगावे. शक्य असल्यास चांगल्या दर्जाचा सीसीटीव्ही कॅमेरे घराच्या दर्शनी भागास व पाठीमागील भागास बसवावेत. शक्य झाल्यास रहदारीचा रस्ता ही सीसीटीव्ही कॅमेरामध्ये घेण्याचा प्रयत्न करावा. घराबाहेर लावण्यात आलेल्या वाहनांना हँडल लॉक सोबतच इतरही चांगल्या पद्धतीचे लॉक करावे. गावातील मंदिरे ही संध्याकाळी बंद राहतील याची काळजी घ्यावी. दानपेटी घंटा या सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात. घराशेजारी गावामध्ये कोणीही संशयित व्यक्ती दिसल्यास त्याचे फोटो काढून पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलिसांकडूनही जास्तीत जास्त सुरक्षिततेबाबत खबरदारी घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी रात्रीचे पेट्रोलिंगही सुरू आहे. तर दुचाकी व अन्य चोऱ्यांबाबत तपासही प्रगतीपथावर आहे. या एकूणच सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत स्थानिक स्वराज्य संस्था यांनाही पत्रे दिलेली आहेत. सार्वजनिक ठिकाणी ग्रामपंचायतींनी सीसीटीव्ही बसवावेत यासाठीही प्रयत्न सुरू असून तसेही पत्र देण्यात आहेत. सार्वजनिक ठिकाणी ग्रामपंचायतींनी सीसीटीव्ही बसवावेत यासाठीही प्रयत्न सुरू असून तसेही पत्र देण्यात येणार आहे. पोलीस पाटील यांनीही ग्रामसभेमध्ये ही सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याबाबत ग्रामपंचायतींना कळवले आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विनंती पत्राची आवश्यकता असल्यास तेही देण्यात येणार आहे; मात्र दिलेल्या सुचनांचे पालन करून किमान खबरदारी घेण्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन यादव यांनी केले आहे.




