रसायनमिश्रीत पाणी प्यायल्याने तीन दुभत्या म्हशीचा जागीच मृत्यु; सहा अत्यावस्थ; लोटे औद्योगिक वसाहतीतील घटना

खेड : लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्यातून नाल्यात सोडण्यात आलेले रसायनमिश्रीत पाणी प्यायल्याने तीन दुभत्या म्हशींचा मृत्यू तर सहा म्हशी अत्यावस्थ झाल्याने लोटे औद्योगिक वसाहतितील रासायनिक कारखान्यांच्या प्रदुषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा प्रकार काल सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडला.
अनधिकृतपणे नाल्यात सोडलेले रसायन मिश्रीत पाणी पिऊन आतापर्यंत अनेक जनावरांचा बळी गेला असल्याने आणखी किती जनावरांचा बळी घेतल्यानंतर संबधित कारखानदार आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाला जाग येणार आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहत परिसरातील आवाशी फाट्याजवळ असलेल्या कुरणात यशवंत आखाडे यांच्या मालकीच्या ९ म्हशी (काही गाभण तर काही दुभत्या) चरण्यासाठी सोडण्यात आल्या होत्या. कुरणाशेजारी असलेल्या नाल्यात कोणत्या तरी रासायनिक कारखान्यातून पाणी सोडण्यात आल्याने हे पाणी रसायनमिश्रीत झाले होते. हे पाणी म्हशी प्यायल्याने त्या अत्यावस्थ झाल्या.
कुरणात चरणाऱ्या म्हशी अचानक जमीनीवर आडव्या होवून तडफडू लागल्याने आखाडे घाबरून गेले. त्यानी आरडाओरड केल्यानंतर आजुबाजुचे नागरिक जमा झाले. कुरणात चरणाऱ्या म्हशींना अचानक काय झाले हा प्रश्न साऱ्यांनाच पडला. दरम्यान काहीजणांनी नाल्यातील पाण्याची पाहणी केली असता नाल्यातील पाणी रसायनमिश्रीत आढळून आले आणि नेमके काय झाले असेल याचा उलगडा झाला.
खेड पंचायत समितीचे उपसभापती जीवन आंब्रे यांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वैद्यकिय पथकाला याबाबत माहिती देताच वैद्यकिय पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अत्यावस्थ झालेल्या म्हशीवर उपचार सुरु करण्यात आले मात्र म्हर्शीच्या पोटात गेलेले विष इतके जहाल होते की तीन म्हशींचा तडफडून मृत्यू झाला. अत्यावस्थ असलेल्या अन्य सहा म्हशींना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत मात्र त्यांची प्रकृती पाहता त्यांची वाचण्याची शक्यता फारच कमी असल्याचे बोलले जात आहे.यशवंत आखाडे यांचे दुध हेच उत्पनाचे साधन आहे. दुधावरच त्यांचे कुटुंब चालते. या दुर्घटनेत तीन म्हशीचा मृत्यू झाला तर अन्य सहा मरणासम अवस्थेत आहेत त्यामुळे कुटुंबाचा चरितार्थ कसा चालवायचा हा प्रश्न आखाडे यांना पडला आहे.या प्रकाराची प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना कल्पना देवून त्यांना पाचारण
करण्यात आले. मात्र रात्री उशीरापर्यंत प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी घटनास्थळी आले नव्हते. अशा प्रकारे नाल्यात विषारी पाणी सोडणे हे पाळीव जनावरांच्या जीवावर बेतणारे असल्याने संबधित कारखान्याची चौकशी होवून
त्या कारखाना व्यवस्थापनावर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.
www.konkanrtoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button