
कोकण बोर्ड इमारतीसाठी जमीन संपादन झाली पण इमारतीचे काय ? त्वरित कार्यवाही करण्याची समविचारी मंचची मागणी
रत्नागिरीः गेली दहा वर्षे उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या १०वी १२ वीच्या परिक्षेत कोकण बोर्ड संपूर्ण राज्यात सर्वप्रथम येत असतानाही केवळ जमीन संपादन करुन कोकण बोर्ड कार्यालय इमारत बांधण्यात आलेली नाही.सद्य स्थितीत हे कार्यालय खाजगी भाड्याच्या जागेत असून भाड्यापोटी लाखो रुपये दिले जात आहेत.स्वतंत्र जागा संपादन केलेली असताना कोकण बोर्ड कार्यालय इमारत लवकरात लवकर उभारण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीने करण्यात आली आहे.
रत्नागिरी येथे नियोजित इंजिनियर कॉलेजसाठी नुकतेच १५३ कोटी रुपये मंजूर झाल्याची घोषणा झाली आहे.हे आनंददायी आहे.शैक्षणिक नवनवीन दालने उभारली जात असताना त्याच धर्तीवर कोकण बोर्ड इमारत उभारणी तातडीने करावी असे समविचारीचे सर्वस्वी बाबा ढोल्ये,महासचिव श्रीनिवास दळवी,राज्य सरचिटणीस संजय पुनसकर,युवाध्यक्ष निलेश आखाडे आदींनी केली आहे.
अधिक वृत्तानुसार,सुमारे दहा वर्षापूर्वी स्वतंत्र कोकण विभागीय शिक्षण मंडळ अस्तित्वात आले.हे मंडळ अस्तित्वात आल्यापासून कोकणातील विद्यार्थ्यांनी संपूर्ण राज्यात सर्वप्रथम येण्याचा मान सातत्याने राखला आहे.मात्र या कोकण बोर्ड इमारतीसाठी जागा घेण्यात येऊनही इमारतीचा पत्ता नसल्याने शैक्षणिक क्षेत्रातील मंडळीनी समविचारीकडे खंत व्यक्त केली. त्याला अनुसरून समविचारीने याबाबतीत सबंधितांकडे पाठपुरावा करण्याचे नियोजन केले आहे.जागा घेऊन कंपाऊंड वॉल बांधण्याखेरीज इमारत संदर्भात हालचाल नसल्याने जनतेतून आश्रय व्यक्त करण्यात येत आहे.
नव्या घोषणा स्वागतार्ह आहेत पण कोकण बोर्ड इमारत हा विषयही तितकाच महत्त्वाचा असल्याने तो पूर्णत्वास जायला हवा अशी येथील नागरिकांची मागणी आहे.
www.konkantoday.com